अयोध्येतील प्रस्तावित मशीद आणि हॉस्पीटलचा आराखडा पाहिलात का?
By मोरेश्वर येरम | Published: December 20, 2020 10:48 AM2020-12-20T10:48:20+5:302020-12-20T10:54:39+5:30
अयोध्येतील प्रस्तावित ठिकाणी मशीद उभारण्याचं काम २६ जानेवारीपासून सुरू करण्याची तयारी देखील केली जात आहे.
लखनऊ
अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणाला सुरुवात झाली असतानाच शनिवारी 'इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन'नेही या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या मशिदीचा आराखडा जारी केला आहे.
अयोध्येतील प्रस्तावित ठिकाणी मशीद उभारण्याचं काम २६ जानेवारीपासून सुरू करण्याची तयारी देखील केली जात आहे. अयोध्येच्या धन्नीपूर येथील भागात मशीद उभारली जाणार आहे. मशिदीचं डिझाइन हे अंडाकार स्वरुपाचं मॉर्डन पद्धतीनं बांधण्यात येणार असून यात पारंपारिक पद्धतीचा घुमट ठेवण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, या मशिदीला लागूनच एक भव्य हॉस्पीटलची निर्मिती केली जाणार आहे. हॉस्पीटल आणि संग्रहालयाचंही डिझाइन जारी करण्यात आलं आहे.
मशिदीचा आकाखडा मंजुर करुन घेण्याची तयारी देखील सुरु झाली आहे. धन्नीपूर येथे उभारली जाणारी मस्जिद ही दोन मजली असणार आहे. येत्या दोन वर्षात या मशिदीच्या उभारणीचं काम पूर्ण होईल अशी शक्यता आहे. मशिदीसोबतच सुसज्ज हॉस्पीटल, संग्रहालय, ग्रंथालय आणि समुदाय स्वयंपाकघर देखील उभारलं जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा नेमका खर्च किती होईल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
महिलांसाठी विशेष जागा
मशिदीमध्ये महिलांसाठी एक वेगळी जागा निर्माण केली जाणार आहे. मशिदीत एकावेळी जवळपास २ हजार लोक नमाज पठण करू शकतील. तर हॉस्पीटलमध्ये २०० खाटांची व्यवस्था असेल. या हॉस्पीटलला सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलचा दर्जा मिळेल अशा पद्धतीचं काम केलं जाणार आहे.
सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या वादग्रस्त मुद्द्यावर निकाल दिला होता. मशिदीच्या निर्मितीसाठी सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच ५ एकर जागा देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले होते. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येच्या सोहावालमधील धन्नीपूर गावात पाच एकर जमीन मशिदीसाठी दिली होती.