अयोध्या मध्यस्थ मंडळाचे कामकाज बंदोबस्तात सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 03:37 AM2019-03-15T03:37:03+5:302019-03-15T03:37:26+5:30
पक्षकारांची हजेरी; तीन दिवस होणार प्राथमिक चर्चा
फैजाबाद : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या २.७७ एकर जमिनीच्या मालकीचा वाद मध्यस्थीने सोडविण्याचा प्रयत्न करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या त्रीसदस्यीय मध्यस्थ मंडळाने बुधवारपासून येथे औपचारिकपणे काम सुरु केले.
फैजाबादचे जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांनी सांगितले की, मध्यस्थ मंडळाने दिलेल्या निर्देशानुसार अयोध्या वादातील सर्वोच्च न्यायालयापुढील २५ पक्षकारांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यानुसार ते पक्षकार व त्यांचे वकील मध्यस्थमंडळापुढे हजर होऊन कामकाजास सुरुवात झाली.
न्यायालयाने मध्यस्थीचे काम पूर्णपणे गोपनीय पद्धतीने व विनाप्रसिद्धी करण्यास सांगितले असल्याने त्याठिकाणी पक्षकारांखेरीज अन्य कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असेही जिल्हाधिकारी झा म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फैजाबाद जिल्हा प्रशासनाने मध्यसेथ मंडळास फैजाबाद अवध विद्यापीठातील एक प्रशस्त दालन कामकाजासाठी सज्ज करून दिले आहे. मध्यस्थ मंडळातील सदस्यांची निवासाची व्यवस्था एका उच्चस्तरीय शासकीय विश्रामगृहात करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
आठ आठवड्यांची मुदत
मध्यस्थ मंडळाचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या. एफएमआय कलिफुल्ला व आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि मध्यस्थीच्या क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ वकील श्रीराम पांचू मंगळवारी येथे पोहोचले. सध्या मध्यस्थ मंडळाने फैजाबादमध्ये तीन दिवसांच्या मुक्कामाचा कार्यक्रम कळविला आहे. न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार मंडळास आठ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यांनी पहिला प्रगती अहवाल ५ एप्रिलपर्यंत न्यायालयात सादर करायचा आहे.