"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 05:57 PM2024-10-31T17:57:56+5:302024-10-31T17:59:24+5:30
अयोध्येतील समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनी दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला निमंत्रण न दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.
अयोध्येतील समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनी दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला निमंत्रण न दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांना निमंत्रित केलं असतं तर दीपोत्सवातही सहभागी झाले असते, असे ते म्हणाले. भाजपा सणांचंही राजकारण करत असल्याचा आरोप खासदारांनी केला आहे.
अयोध्येत दीपोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी दीपोत्सवाने दोन रेकॉर्ड केले. पहिला रेकॉर्ड सरयू आरतीचा तर दुसरा रेकॉर्ड सर्वाधिक दिवे लावण्याचा झाला. या कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते, परंतु समाजवादी पक्षाचे फैजाबादचे खासदार अवधेश प्रसाद या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.
भाजपाने या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं नव्हतं आणि आता भाजपा सणांचं राजकारण करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अवधेश प्रसाद म्हणतात की, हा कार्यक्रम भाजपासाठी वैयक्तिक झाला आहे. मी येथून खासदार असून मला निमंत्रित करण्यात आलं नाही.
अवधेश प्रसाद यांच्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. अयोध्येतील भाजपाचे आमदार वेदप्रकाश गुप्ता यांनी प्रत्युत्तर देताना सांगितलं की, अवधेश प्रसाद यांना प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र आजपर्यंत त्यांना अयोध्येला भेट देण्यासाठी वेळ मिळाला नाही. देश-विदेशात दीपोत्सवाचा जो अद्भूत कार्यक्रम झाला त्यावर खासदार आता राजकारण करत आहेत.