Ayodhya News : अयोध्येत उभारणार CM योगी आदित्यनाथांचे भव्य मंदिर! 24 तारखेला भूमीपूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 02:54 PM2023-02-21T14:54:10+5:302023-02-21T14:54:18+5:30
Ayodhya News: भगवान श्री रामाची नगरी असलेल्या अयोध्येत राम मंदिरासह 'श्री योगी' मंदिर बांधले जात आहे.
CM Yogi Adityanath Temple: भगवान श्री रामाची नगरी असलेल्या अयोध्येत राम मंदिरासह अनेक मठ आणि मंदिरे आहेत. पण, आता या शहराची ओळख मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंदिरानेही होणार आहे. मुख्यमंत्री योगींचे कार्यस्थळ असलेल्या अयोध्येत 'श्री योगी' मंदिर बांधले जाणार आहे. योगींचे प्रचारक प्रभाकर मौर्य हे मंदिर बांधणार आहेत. मंदिराचे भूमिपूजन 24 फेब्रुवारीला होणार असून, रामललाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास हे भूमीपूजन करणार आहेत. यावेळी हनुमानगढीचे पुजारी राजू दास आणि अयोध्येतील अनेक ज्येष्ठ संत सहभागी होणार आहेत.
श्री योगींचे हे मंदिर 101 फूट उंच असेल. या मंदिराची लांबी आणि रुंदी 50×50 असेल. हे मंदिर बांधण्यासाठी सुमारे 4 कोटी रुपये खर्च येणार आहे. यातच आता एवढा पैसा कुठून येणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यावर प्रभाकर मौर्य यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते त्यांच्या यूट्यूब चॅनलवरुन हे पैसे जोडत आहेत, तसेच अनेक मुस्लिम संघटनातील लोक मदत करत आहेत.
24 फेब्रुवारी रोजी भूमिपूजन होणार आहे
अयोध्येतील कल्याण भदरसा गावातील मजरे मौर्या पूर्वेला श्री योगी मंदिर बांधले जाणार आहे. मंदिर उभारणीचे 24 फेब्रुवारीला भूमीपूजन होणार आहे. भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही निमंत्रण पत्र पाठवण्यात आले आहे. यासोबतच अयोध्येतील अनेक ज्येष्ठ संतांना भूमिपूजनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण पत्रे देण्यात आली आहेत. हे मंदिर बांधण्यासाठी सुमारे 5 वर्षे लागतील. या मंदिरात देवाच्या मूर्तीऐवजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मूर्ती असेल. देवाप्रमाणेच मंदिरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी मूर्तीची पूजा केली जाईल आणि संध्याकाळी आरती होईल.