उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी अयोध्येत तणावपूर्ण स्थिती; पोलीस बंदोबस्तात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 05:45 PM2018-11-23T17:45:06+5:302018-11-23T17:47:31+5:30
हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळे स्थानिक चिंतेत
अयोध्या: सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणाची सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना राम मंदिराच्या मुद्यावरुन आक्रमक झाल्या आहेत. हिंदुत्तवादी संघटनांकडून अयोध्येत सभांचं आयोजन करण्यात येतं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या आणि परवा अयोध्येचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अयोध्येत तणावपूर्ण स्थिती आहे. एखादी अनुचित घटना होण्याची भीती लोकांना सतावते आहे. त्यामुळे अनेकांनी जीवनावश्यक वस्तू घरी आणून ठेवल्या आहेत. काही दिवस घरीच राहावं लागल्यास कोणतीही अडचण येऊ नये, याची तयारी स्थानिकांनी केली आहे.
उद्धव ठाकरे उद्या अयोध्येला पोहोचतील. यानंतर ते संतांच्या भेटी घेतील. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो शिवसैनिक अयोध्येला पोहोचले आहेत. याशिवाय विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसभेला दोन लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. अयोध्येत अचानक झालेल्या गर्दीमुळे वातावरण तणावपूर्ण झालं आहे. शहरातील स्थिती बिघडण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे अनेकांनी घरात जीवनाश्यक वस्तू गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
उद्धव ठाकरे उद्या मुंबईहून अयोध्येसाठी रवाना होतील. उद्धव ठाकरे शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील मातीचा कलश घेऊन अयोध्येला पोहोचणार आहेत. शिवनेरी किल्ल्यावरील मातीनं भरलेला कलश उद्धव ठाकरे राम जन्मभूमी स्थळावरील महंतांकडे सोपवतील. याशिवाय ते साधूसंतांसोबत राम मंदिराच्या उभारणीबद्दल चर्चा करणार आहेत. अयोध्येत रामलल्लाचं दर्शन केल्यावर ते शरयूच्या काठावर पूजा करतील. या दौऱ्यासाठी शिवसेनेनं 'हर हिंदू की एकही पुकार, पहले मंदिर फिर सरकार,' अशी घोषणा दिली आहे.