अयोध्या प्रश्नी सलमान नदवींचा घूमजाव, मध्यस्थीच्या फॉर्म्युल्याला बगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:49 AM2018-03-03T00:49:57+5:302018-03-03T00:49:57+5:30
रामजन्मभूमी-बाबरी मशीद तिढा न्यायालयाच्या चौकटीबाहेर सोडविण्याचा फॉर्म्युला आखणारे मौलाना सलमान नदवी यांनी, या प्रश्नी आता स्वत:च घूमजाव केला आहे.
लखनऊ : रामजन्मभूमी-बाबरी मशीद तिढा न्यायालयाच्या चौकटीबाहेर सोडविण्याचा फॉर्म्युला आखणारे मौलाना सलमान नदवी यांनी, या प्रश्नी आता स्वत:च घूमजाव केला आहे. अयोध्या प्रश्नी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू, अशी नवी भूमिका त्यांनी स्वीकारली आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रश्न मी माझ्या अजेंड्यावरून काढून टाकला आहे. दोन्ही बाजूंच्या पक्षकारांनी या प्रश्नी स्वत: तोडगा काढावा. हा प्रश्न मध्यस्थीने सोडविण्यास दोन्ही धर्माचे पक्षकार तयार नाहीत. त्यामुळे मध्यस्थीच्या फॉर्म्युल्याचा फायदाच नाही. म्हणून मी स्वत:ला यापासून दूर ठेवत आहे. त्यामुळे याबाबत न बोलता, मी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहणार आहे.
दरम्यान, गुरुवारी श्री श्री रविशंकर प्रसाद यांनी मौलाना नदवी यांची भेट घेत, अयोध्या प्रश्नी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी माध्यमांशी बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले होते, अयोध्या प्रश्नी दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, योग्य दिशेने चर्चा सुरू आहे.
दोन्ही धर्मांच्या लोकांमध्ये एकजूट राहावी आणि या ठिकाणी भव्य असे राम मंदिर उभारावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.