३२४० जणांचा अर्ज, २४ जणांची निवड; ३ महिन्याचे प्रशिक्षण, राम मंदिरात योग्यतेनुसार पुजारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 09:36 AM2024-01-02T09:36:23+5:302024-01-02T09:39:36+5:30
Ayodhya Ram Mandir News: मुलाखतींच्या तीन फेऱ्या आणि १४ प्रश्न यातून या २४ जणांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Ayodhya Ram Mandir News ( Marathi News ): २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू असून, स्थापन होणाऱ्या मूर्ती निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच राम मंदिरात २४ पुजारी असणार आहेत. या सर्वांना ३ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तब्बल ३ हजार २४० जणांमधून २४ जण निवडण्यात आले आहेत.
राम मंदिराचे महंत मिथिलेश नंदिनी शरण आणि महंत सत्यनारायण दास मंदिरातील पूजा करण्यासाठी पौरोहित्य आणि कर्मकांडाचे प्रशिक्षण देत आहेत. या पुजाऱ्यांच्या निवडीतून सामाजिक समरसतेचा संदेश देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. पुरोहितांची निवड केवळ गुणवत्तेच्या आधारे करण्यात आली आहे. ‘हरि का भजे सो हरि का होई’यानुसार समाजाला नवा संदेश देण्यासाठी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने हा उपक्रम हाती घेतला आहे, जाती-पातीवरून नाही, तर योग्यतेवरून राम मंदिरासाठी पुजाऱ्यांची निवड करण्यात आल्याचे अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.
कठोर प्रशिक्षण, मोबाइल वापरावर बंदी
रामानंदी परंपरेनुसार सर्व पुजाऱ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या काळात हे सर्व जण गुरुकुलचे नियम पाळत आहेत. निवड करण्यात आलेल्यांपैकी कोणीही मोबाईल वापरू शकत नाही आणि कोणीही बाहेरच्या व्यक्तीशी संपर्क साधू शकत नाही. तीन टप्प्यांत घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यात संध्यावंदन, नाम, गोत्र, शक, प्रवरा यानुसार प्रश्न विचारण्यात आले. तर, दुसऱ्या टप्प्यात आचार्यांच्या पदवीनुसार प्रश्न विचारण्यात आले. श्रीरामांची उपासना पद्धत, ध्यान मंत्र, सीता मातेचा ध्यान मंत्र, भरताचा ध्यान मंत्र. हनुमंतांचा वैदिक ध्यान मंत्र तसेच श्रीरामांचा जन्म कोणत्या लग्नी झाला, अशा काही गोष्टी विचारण्यात आल्या.
१४ प्रश्न आणि २५ जणांची निवड
राम मंदिरासाठी पुजाऱ्यांची निवड करताना १४ प्रश्न विचारण्यात आले. या सर्वांची योग्य उत्तरे दिलेल्या २४ पुरोहितांची निवड करण्यात आली. मुलाखतीच्या तीन फेऱ्यांनंतर ३२४० उमेदवारांपैकी २५ उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. यापैकी एक आचार्य दैवज्ञ कृष्ण शास्त्री यांनी आपले नाव मागे घेतले. आचार्य शास्त्री यांच्या मते, शेवटच्या फेरीतील तीन प्रश्न अत्यंत कठीण होते. हनुमानजींचे वैदिक ध्यान मंत्र, सीता मातेचे ध्यान मंत्र आणि भरतजींचे ध्यान मंत्र, याकडे सर्वसाधारणपणे लक्ष दिले जात नाही.