"3 लाख रामभक्तांनी घेतलं रामललाचं दर्शन"; यूपी सरकारचं अयोध्येबाबत मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 04:53 PM2024-01-23T16:53:06+5:302024-01-23T16:53:33+5:30
Ram Mandir :देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या रामभक्तांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर परिसर जय श्री राम आणि जय सियारामच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
अयोध्येत मंगळवारी प्रथमच रामभक्तांसाठी राम मंदिर खुलं करण्यात आलं. पहिल्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या रामभक्तांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर परिसर जय श्री राम आणि जय सियारामच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
राम मंदिरात पहिल्याच दिवशी आतापर्यंत किती लोकांनी रामललाचं दर्शन घेतलं? याबाबत यूपीच्या योगी सरकारचं मोठं विधान समोर आलं आहे. यूपी सरकारच्या विधानानुसार, पहिल्या दिवशी आतापर्यंत सुमारे 3 लाख रामभक्तांनी रामललाचं दर्शन घेतलं आहे. सुरक्षेबाबत प्रशासनाने त्रिस्तरीय सुरक्षा कवच निर्माण केलं आहे. अयोध्या मंदिराभोवती सुमारे आठ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
इंडियन आर्किटेक्चरचे पोस्टर बॉय दीक्षु कुकरेजा यांनी रामललाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी येत्या काही वर्षांत दररोज तीन लाखांहून अधिक लोक अयोध्येत येतील, अशी आशा व्यक्त केली होती. व्हॅटिकन सिटी, कंबोडिया, जेरुसलेमसह परदेशातील अशाच उदाहरणांचा अभ्यास करून मंदिर शहराचे नियोजन करण्यात आल्याचं ते म्हणाले होते.
कुकरेजा म्हणाले की, वाढती लोकसंख्या आणि पर्यटनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही रस्ते, पूल, सांडपाणी व्यवस्था आणि उपयुक्तता यासारख्या आधुनिक पायाभूत सुविधांची रचना केली आहे, तसेच या घडामोडींमुळे शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्वरूपाशी तडजोड होणार नाही याची काळजी घेतली आहे. आम्ही टाउनशिपसाठी एक लेआउट डिझाइन करण्यावर काम केले जे कार्यक्षम जमिनीच्या वापरास प्रोत्साहन देते, गर्दी कमी करते आणि रहिवाशांच्या जीवनाची एकूण गुणवत्ता वाढवते.