अरे व्वा! राम मंदिराला दररोज मिळतंय इतक्या लाखांचं दान; भक्तांची संख्याही झाली दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 03:22 PM2024-01-19T15:22:16+5:302024-01-19T15:42:58+5:30
अयोध्येतील राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांबाबत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.
रामनगरी अयोध्येसह संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येच्या राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिरात फुलांची विशेष सजावट केली जात आहे. कोट्यवधी रामभक्त या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी अयोध्येतील राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांबाबत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. राम मंदिरासाठी भाविक दररोज 4 ते 5 लाख रुपयांचं दान देत आहेत. त्याचबरोबर भाविकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिराला दररोज 4 ते 5 लाख रुपये दान म्हणून मिळत आहे. अशा प्रकारे मंदिराला सुमारे 2 कोटी रुपये दानस्वरुपात म्हणून मिळत आहेत. 22 जानेवारीआधी राम मंदिर परिसरात धार्मिक विधी सुरू आहेत. आता 22 जानेवारीची भक्तांना प्रतीक्षा आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भाविकांची संख्या दुपटीने वाढली
राम मंदिरात रामभक्तांची भलीमोठी रांग लागली आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर अयोध्या राम मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या दुपटीने वाढली आहे. सध्या येथे दररोज सुमारे 30 हजार भाविक येत आहेत. सोहळ्यानंतर ही संख्या 50,000 च्या पुढे जाऊ शकते. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन अयोध्येत कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये, यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे.
अयोध्येत बनवले जात आहेत तुपाचे 13 लाख लाडू
अयोध्येत सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्येत तुपाचे 13 लाख लाडू बनवले जात आहेत. 22 जानेवारीला अयोध्येत येणाऱ्या भाविकांना हे लाडू प्रसाद म्हणून दिले जाणार आहेत. सुमारे 8000 व्हीआयपी पाहुण्यांना अयोध्येत आमंत्रित करण्यात आले आहे. यासाठी 11, 7 आणि 5 लाडूंची पाकिटे तयार केली जात आहेत. याशिवाय इतर भाविकांनाही हा विशेष प्रसाद दिला जाणार आहे.