अदानी-अंबानी नाही! 'या' व्यक्तीने राम मंदिरासाठी दिली सर्वाधिक देणगी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 12:53 PM2024-01-20T12:53:08+5:302024-01-20T12:55:08+5:30
अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.
अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून या सोहळ्याची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिर उभ करण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात दान गोळा झाले आहे. आतापर्यंत मंदिरासाठी ५,५०० कोटी पेक्षा जास्त पैसे गोळा झाले आहेत. देशातून सर्वात जास्त दान देणारी कोणी उद्योगपती नाहीत. तर ते स्वत:ला फकीर म्हणून घेणारे अध्यात्मिक गुरु मोरारी बापू आहेत. त्यांनी अदानी, अंबानी यांच्यापेक्षा जास्त मोठे दान मंदिरासाठी केले आहे.
देशात राम मंदिरासाठी मोरारी बापूंनी सर्वाधिक देणगी दिले आहे. रामकथेचे सुप्रसिद्ध निवेदक मोरारी बापू अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगीदार म्हणून आघाडीवर आहेत.
एवढी दिली देणगी
सहा दशकांहून अधिक काळ रामायणाचा प्रचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बापूंनी एकूण १८.६ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ही रक्कम भारतातील ११.३० कोटी रुपये, यूके आणि युरोपमधून ३.२१ कोटी रुपये तसेच अमेरिका, कॅनडा आणि इतर अनेक देशांमधून ४.१० कोटी रुपये जमा करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये, कोरोना काळात गुजरातमध्ये एक ऑनलाइन कार्यक्रम झाला होता, यावेळी मोरारी बापूंनी जनतेला आवाहन केले होते. त्या आवाहनात मोरारी बापूंनी राम मंदिराच्या उभारणीसाठी हातभार लावण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. यानंतर ही मोठी देणगी गोळा झाली होती.
याबाबत बोलताना मोरारी बापू म्हणाले, "आम्ही रामजन्मभूमी ट्रस्टला फक्त १५ दिवसांत ११.३ कोटी रुपये सुपूर्द केले आहेत. उर्वरित रक्कम जी परदेशातून उभी केली आहे त्यांना आवश्यक मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये कथा वाचतील तेव्हा थकबाकीची रक्कम रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला दिली जाईल, असंही ते म्हणाले. एकूण देणगी १८.६ कोटी रुपये आहे. मोरारी बापू यावर्षी २४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत अयोध्येत रामकथा करणार आहेत.
मोरारी बापूंनी दिलेल्या माहितीनुसार, रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय ऑक्टोबर २०२३ मध्ये बरसाना येथे सुरू असलेल्या रामकथेदरम्यान त्यांना भेटण्यासाठी आले होते. चंपत रायजींनी त्यांना २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आणि मूर्तीच्या अभिषेकासाठी आमंत्रित केले. रामलला यांच्या अभिषेकनंतर त्यांना २४ फेब्रुवारी ते ०३ मार्च या कालावधीत अयोध्येत कथा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.