१० दिवसांत राम मंदिराला १२ कोटींचे दान; लाखो भाविकांचे रामदर्शन, उत्सवांचे वेळापत्रक आले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 10:34 AM2024-02-03T10:34:51+5:302024-02-03T10:35:03+5:30

Ayodhya Ram Mandir: राम मंदिरासाठी ऑनलाइनच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात देणगी दिली जात आहे.

ayodhya ram mandir get 12 crore offline and online donation last 10 days | १० दिवसांत राम मंदिराला १२ कोटींचे दान; लाखो भाविकांचे रामदर्शन, उत्सवांचे वेळापत्रक आले

१० दिवसांत राम मंदिराला १२ कोटींचे दान; लाखो भाविकांचे रामदर्शन, उत्सवांचे वेळापत्रक आले

Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात रामलला विराजमान झाले. रामदर्शनाची आस लागलेल्या लाखो भाविकांनी आतापर्यंत अयोध्या वारी केली आहे. राम मंदिराला मोठ्या प्रमाणात दान-देणगीही दिली जात आहे. पहिल्या १० दिवसांत राम मंदिराला १२ कोटींची दान प्राप्त झाले आहे. ऑनलाइनच्या माध्यमांतूनही राम मंदिरासाठी देणगी दिली जात आहे.

रामभक्त रामललाच्या दरबारात खुल्या दिलाने दान करत आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून राम मंदिरासाठी देणगी दिली जात आहे. २३ जानेवारीला राम मंदिर सर्वसामान्य भक्तांसाठी खुले झाल्यापासून भाविकांची गर्दी होत आहे. गेल्या दहा दिवसांत रामललाला सुमारे १२ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. २२ जानेवारीलाच राम मंदिरात ३.१७ कोटी रुपयांची देणगी मिळाली होती.

लाखो भाविकांचे रामदर्शन अन् कोट्यवधींचे दान

राम मंदिरात दररोज सरासरी दोन ते अडीच लाख भाविक राम दर्शन घेण्यासाठी येतात. तर मिळालेल्या माहितीनुसार,  २३ तारखेला २.६२ कोटी रुपयांचे धनादेश, २७ लाख रोख, २४ जानेवारीला १५ लाख रुपयांचे धनादेश आणि रोख, २५ जानेवारीला ४० हजार रुपयांचा धनादेश अन् ८ लाख रुपये रोख, २६ जानेवारीला ०१,०४,६० हजार रुपयांचे धनादेश अन् ५.५० लाख रुपये रोख, २७ जानेवारीला १३ लाखांचे धनादेश अन् ८ लाख रुपये रोख, २८ जानेवारीला १२ लाखांचे धनादेश आणि रोख, २९ जानेवारीला ७ लाख रुपयांचा धनादेश अन् ५ लाख रुपये रोख दान आले आहे. या आकडेवारीनुसार राम मंदिरासाठी येणारे दान हे दानपेटीत टाकल्या जाणाऱ्या दानापेक्षा वेगळे आहे. एका अंदाजानुसार, दानपेटीत दररोज ३ लाख रुपयांची देणगी टाकली जात आहे. 

वार्षिक उत्सवांचे वेळापत्रक आले

मुख्यमंत्री योगी यांच्यासह भाजपचे सर्व आमदार ११ फेब्रुवारीला रामललाचे दर्शन घेणार आहेत. नव्याने बांधलेल्या राम मंदिराचे वार्षिक उत्सवांचे वेळापत्रक तयार आहे. नवीन मंदिरात १४ फेब्रुवारीला वसंती पंचमी हा पहिला उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. यामध्ये देवी सरस्वतीची पूजा केली जाणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. राम मंदिरात वर्षभरात १२ प्रमुख सण आणि उत्सव साजरे केले जाणार आहेत.
 

Web Title: ayodhya ram mandir get 12 crore offline and online donation last 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.