घर घर अक्षत मोहीम : समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने आए है; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अक्षता वाटपाचा शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 07:28 AM2024-01-02T07:28:43+5:302024-01-02T07:31:35+5:30
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महामंत्री चंपतराय यांनी साधूसंतांसोबत या वस्तीतील अनेक घरांमध्ये जाऊन अक्षतांचे वाटप केले.
त्रियुग नारायण तिवारी -
अयोध्या : प्रभू श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा व मंदिर उद्घाटनासाठी कोट्यवधी भारतीयांना आमंत्रण देण्याचा देशव्यापी शुभारंभ सोमवारी येथील वाल्मीकी समाजाच्या वस्तीपासून करण्यात आला. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महामंत्री चंपतराय यांनी साधूसंतांसोबत या वस्तीतील अनेक घरांमध्ये जाऊन अक्षतांचे वाटप केले.
यावेळी ‘समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने आए है, हर गाव को राम मंदिर, हर मोहल्ला अयोध्या बनाएंगे’ असे नारे देण्यात आले. राम मंदिराच्या उभारणीसाठी संघर्षापासून विविध प्रकारचे योगदान आम्ही मागितले होते, ते तुम्ही भरभरून दिले, आता आम्ही तुम्हाला आमंत्रित करायला आलो आहोत असा भाव त्यामागे होता.
आरती करून मूर्तीला अक्षत कलशाचा स्पर्श
घर घर अक्षत मोहिमेला नगर कोतवाल मत गजेंद्र मंदिरापासून सुरुवात झाली. चंपतराय आणि साधूसंतांनी राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न यांची आरती करून मूर्तीला अक्षत कलशाचा स्पर्श केला. यावेळी चंपतराय म्हणाले की, प्रभू श्री रामाच्या आगमनानिमित्त संपूर्ण देश स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे १४ जानेवारीपासून या कामात सहभागी व्हा.
देशभरात अक्षता वाटप सुरू
- वस्तीतील रहिवाशांना अक्षता, पत्रक आणि नवीन मंदिराचे छायाचित्र देण्यात आले. देशभर कोट्यवधी रामभक्तांना असे वाटप सुरू करण्यात आले आहे.
- प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मात्र, आपापल्या गावातच राहून प्रत्येकाने उत्सव साजरा करावा, मंदिरांमध्ये पूजा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
- अयोध्येतील सोहळ्यासाठीच प्रत्येकाला प्रतीकात्मक आमंत्रित करण्याच्या हेतूने अक्षता वाटप करण्यात येत आहेत.