मक्का आणि व्हॅटिकन सिटी मागे पडले; 48 दिवसांत कोट्यवधी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 02:48 PM2024-04-03T14:48:21+5:302024-04-03T14:49:58+5:30
Ayodhya Ram Mandir: भगवान श्रीरामाचे भव्य राम मंदिर तयार झाल्यापासून आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. यामुळे अयोध्येचा विकास मोठ्या प्रमाणावर होत आहे.
Ayodhya Ram Mandir: श्रीराम भक्तांची अनेक दशकांची इच्छा पूर्ण झाली अन् अखेर 22 जानेवारी 2024 रोजी भगवान श्रीराम अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाले. रामललाच्या येण्याने अयोध्येचे जुने वैभव पुन्हा परत आले आहे. पूर्वी मागास शहर म्हणून ओळख असलेल्या अयोध्येत आता अनेक सुविधा मिळत आहेत. त्यामुळेच देशासह जगभरातून रामभक्त रामललाच्या दर्शनासाठी अयोध्या नगरीत मोठ्या संख्येने येताहेत. श्रीराम मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, दररोज सुमारे दीड ते दोन लाख भाविक रामललाचे दर्शन घेत आहेत. सुट्टीच्या दिवशी ही संख्या अनेक पटींनी वाढते.
रामनगरी अयोध्या आता धार्मिक राजधानी म्हणून उदयास येत आहे. रामलला 22 जानेवारीला विराजमान झाले, तेव्हापासून लाखो भाविक रामनगरीत दाखल होताहेत. गेल्या 2 महिन्यांबद्दल बोलायचे झाले, तर एक कोटीहून अधिक लोकांनी रामललाचे आशीर्वाद घेतले आहेत. संपूर्ण जगात एवढ्या मोठ्या संख्येने कोणत्याही धार्मिक स्थळी भाविक पोहोचलेले नाहीत. ख्रिश्चनांचे सर्वात मोठे धार्मिक स्थळ असलेल्या व्हॅटिकन सिटीला दरवर्षी सुमारे 90 लाख लोक भेट देतात, तर गेल्या वर्षी 13.5 कोटी लोकांनी मुस्लिमांचे सर्वात मोठे पवित्र स्थान मक्का येथे भेट दिली होती. राम मंदिराबाबत बोलायचे झाले तर दररोज लाखो भाविक येत असून अवघ्या दीड ते दोन महिन्यांत सुमारे एक कोटी लोकांनी रामललाचे आशीर्वाद घेतले आहेत.
रोजगाराच्या संधीही वाढल्या
भाविकांची संख्या वाढल्यामुळे अयोध्येत रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. शहरात सर्वत्र व्यवसाय तर विस्तारत आहेच, शिवाय रामनगरीच्या आसपास राहणाऱ्या लोकांना रोजगाराच्या इतर संधीही उपलब्ध होत आहेत. रामनगरीमध्ये अवघ्या दोन महिन्यांत एक कोटींहून अधिक लोकांनी दर्शन घेतले, तर उरलेल्या 10 महिन्यांचा आकडा काय असेल, याची कल्पना करा.
1.25 कोटी भाविक आले-ट्रस्टचा दावा
राम मंदिर ट्रस्टचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दावा केला की, 1 कोटी 25 लाखांहून अधिक रामभक्तांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. लोक मक्का-मदिना येथे फक्त हजच्या वेळी जातात, ख्रिश्चन धार्मिक स्थळांनाही केवळ विशेष सणांवर जातात. पण, अयोध्येत दररोज जवळपास 2 लाख लोक येत आहेत. दरम्यान, राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, राम मंदिरातील रामभक्तांची मोजणी तंत्रज्ञानाच्या आधारे केली जाते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अनेक सॉफ्टवेअर बसवण्यात आले असून, त्याद्वारे भाविकांची संख्या मोजली जाते.