ठरलं! ‘या’ वेळेत होणार राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना; PM मोदी जाणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 02:45 PM2023-06-20T14:45:15+5:302023-06-20T14:46:46+5:30
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली असून, काही तारखा समोर आल्या आहेत.
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: गेल्या काही दिवसांपासून राम मंदिराच्या लोकार्पणाबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. राम मंदिराच्या भव्य लोकार्पण सोहळ्याबाबत जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असा दावा केला जात आहे. राम मंदिराचे संपूर्ण काम तीन टप्प्यात केले जाणार आहे. यातच आता प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची राम मंदिरात प्रतिष्ठापना कधी होणार, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी २०२४ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची राम मंदिरात प्रतिष्ठापना केली जाणार आहे. हा प्रतिष्ठापना सोहळा तब्बल १० दिवस चालणार आहे. यानंतर भाविकांना दर्शनासाठी पहिला टप्पा खुला केला जाईल, असे सांगितले जात आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
मकर संक्रांतीला करणार प्राणप्रतिष्ठा
अयोध्येत बांधल्या जात असलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मकर संक्रांती कालावधीत केली जाणार आहे. १५ जानेवारी २०२४ रोजी हा सोहळा सुरू होईल आणि २४ जानेवारी २०२४ पर्यंत हा सोहळा सुरू राहील. या काळात अनेकविध धार्मिक कार्यक्रम राबवले जातील. २४ किंवा २५ जानेवारीपासून भाविक नवीन राम मंदिरात प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊ शकतील, असे सांगितले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण पाठवले जाणार आहे, अशी माहिती नृपेंद्र मिश्रा यांनी दिली. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी अयोध्या दौऱ्यावर या सोहळ्यासाठी जाऊ शकतात, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन केले होते. परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये प्राणप्रतिष्ठा लाइव्ह पाहता यावी, यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.