धनवर्षाव! राम मंदिरात देणगी मोजून थकताहेत 14 कर्मचारी, किती वेळा उघडली जाते दानपेटी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 01:17 PM2024-02-04T13:17:53+5:302024-02-04T13:25:08+5:30

राम मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, 25 लाखांहून अधिक राम भक्तांनी रामललाचे दर्शन घेतले आहे.

ayodhya ram mandir ramlala devotee donation amount daan peti shriram janmabhoomi teerth kshetra | धनवर्षाव! राम मंदिरात देणगी मोजून थकताहेत 14 कर्मचारी, किती वेळा उघडली जाते दानपेटी?

धनवर्षाव! राम मंदिरात देणगी मोजून थकताहेत 14 कर्मचारी, किती वेळा उघडली जाते दानपेटी?

रामललाच्या दर्शनासाठी येणारे भाविक मोठ्या प्रमाणात दान करत आहेत. दानपेटीत रामभक्त जेवढे दान देत आहेत त्याची मोजणी करण्यासाठी 14 जण तैनात करण्यात आले आहेत. रामभक्त राम मंदिरातील दानपेटीतच दान करत नाहीत, तर संगणकीकृत काउंटरवरही दान करत आहेत. राम मंदिरात दिवसातून अनेक वेळा दानपेट्या रिकाम्या होतात आणि 11 बँक कर्मचारी आणि 3 मंदिर कर्मचारी दान केलेल्या पैशांची मोजणी करत असतात.

अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होऊन 12 दिवस उलटले आहेत. राम मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, 25 लाखांहून अधिक राम भक्तांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत राम मंदिरात असलेल्या दानपेट्यांमध्ये रामभक्तांकडून 8 कोटी रुपयांहून अधिक दान जमा झाले आहे. तर सुमारे 3.50 कोटी रुपये ऑनलाइन प्राप्त झाले आहेत.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामललाच्या गर्भगृहासमोरील दर्शन मार्गाजवळ चार मोठ्या आकाराच्या दानपेट्या ठेवण्यात आल्या असून त्यामध्ये मंदिरात येणारे रामभक्त दान करतात. याशिवाय 10 संगणकीकृत काउंटरवरही लोक देणगी देत ​​आहेत. रामभक्तांच्या देणग्यांनी दानपेट्या लवकर भरतात, ज्या दिवसातून किमान दोनदा रिकाम्या कराव्या लागतात.

प्रकाश गुप्ता यांनी सांगितलं की, चार दानपेट्यांमधील दानाचा हिशोब ठेवण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली असून त्यात बँकेचे 11 कर्मचारी आणि मंदिर ट्रस्टचे 3 कर्मचारी आहेत. ते वेगवेगळ्या काउंटरवर हजर असतात आणि दानपेटीतील दानाचा हिशोब घेतात. हे सर्व बँक कर्मचारी दान केलेल्या पैशाची मोजणी करतात आणि दान केलेले पैसे दररोज संध्याकाळी राम मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात जमा करतात. ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली होते. दररोज 2 लाखांहून अधिक रामभक्त राम मंदिरात रामललाचे दर्शन घेतात.
 

Web Title: ayodhya ram mandir ramlala devotee donation amount daan peti shriram janmabhoomi teerth kshetra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.