रामलला देतायत १५ तास दर्शन, आरामच मिळत नाही; मंदिर ट्रस्ट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 07:30 PM2024-02-13T19:30:43+5:302024-02-13T19:31:55+5:30
Ayodhya Ram Mandir: आतापर्यंत सुमारे ३० लाखांहून अधिक भाविकांनी रामदर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे.
Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर भाविकांसाठी राम मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. राम मंदिरातील बालस्वरुपातील रामललाचे रुप सर्वांनाच मोहून टाकत आहे. राम मंदिरात जाऊन रामदर्शन घेण्यासाठी दररोज सुमारे अडीच लाख भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. यातच आता रामलला १५-१५ तास दर्शन देत असून, राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी यावर भाष्य केले आहे.
सकाळी ६ वाजता राम मंदिर खुले करण्यात येते. तर रात्री १० वाजता मंदिर बंद होते. राम मंदिरातील भाविकांचा वाढता ओघ पाहता रामदर्शनासाठीची वेळ वाढवण्यात आली होती. मात्र, बालस्वरुपातील रामलला अनेक तास भक्तांना दर्शन देत असल्यामुळे रामलला प्रभूंना आराम मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. लोकांचे असा मत आहे की ५ वर्षांच्या बालरुपात पूजल्या जात असलेल्या प्रभू श्रीरामांना चांगल्या विश्रांतीचीदेखील आवश्यक आहे. भगवंताचे बालस्वरूप १४ तास जागे राहणे कितपत व्यावहारिक आहे? असा सवाल चंपत राय यांनी केला आहे.
राम मंदिर ट्रस्ट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
२३ जानेवारीपासून ते १२ फेब्रुवारीपर्यंत सुमारे ३० लाखांहून अधिक भाविकांनी रामदर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. श्रीराम नवमीपर्यंत हीच स्थिती कायम राहू शकते, असा अनेकांचा कयास आहे. त्यामुळे आता राम मंदिर ट्रस्ट याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. राम मंदिर दर्शनाची वेळ काही तासांनी कमी केली जाऊ शकते, अशी शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत ट्रस्ट विचारविनिमय करत आहे. बालस्वरुपातील रामलला प्रभूंना आराम मिळण्यासाठी ट्रस्टकडून काही व्यवस्था केली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, रामललाचे पूजन करणारे प्रमुख आचार्य सत्येंद्र दास यांनीही चंपत राय यांच्या म्हणण्याचे समर्थन केले आहे. रामलला पाच वर्षांच्या बालरूपात विराजमान आहेत. १५ तास अखंड दर्शन देत आहेत. त्यांना विश्रांतीही मिळत नाही. तसेच ते शास्त्रसंमत आणि समर्थनीय नाही. रामलला प्रभूंना दुपारी किमान एक ते दोन तास विश्रांतीची गरज आहे, असे आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटले आहे.