अयोध्येत रामनवमीची तयारी; राम मंदिर २४ तास खुले राहणार, १५ लाख भाविक रामलला दर्शनाला येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 07:36 AM2024-03-29T07:36:51+5:302024-03-29T07:38:04+5:30
Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर पहिल्यांदाच अयोध्येत मोठ्या प्रमाणात रामनवमी साजरी केली जाणार असून, यानिमित्ताने तब्बल १५ लाख भाविक रामलला दर्शनासाठी येऊ शकतात, असे सांगितले जात आहे.
Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिरात रामललाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांचा ओघ कमी होताना दिसत नाही. यातच राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा श्रीराम नवमीचा उत्सव अयोध्येत मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरी, प्रशासन आणि श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट सज्ज झाले आहेत. रामनवमीच्या कालावधीत अयोध्येत तब्बल १५ लाख भाविक रामललाचे दर्शन घेण्यासाठी येऊ शकतात, असा कयास असून, त्यासाठी २४ राम मंदिर खुले ठेवण्याचे निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत राम मंदिर २४ तास खुले राहणार आहे. त्यामुळे भाविकांना कोणत्याही वेळेस आले, तरी रामललाचे दर्शन सुलभपणे घेता येणार आहे. आवश्यकता भासल्यास १८ एप्रिल रोजीही राम मंदिर दिवसभर खुले ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. श्रीराम नवमीनिमित्त अयोध्येत १५ लाख भाविक येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने अयोध्या प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी सातत्याने बैठका घेत असून, सर्व गोष्टींचा सविस्तर पद्धतीने आढावा घेत आहेत, असे सांगितले जात आहे.
राम मंदिरात दररोज सुमारे २ लाखांच्या घरात भाविक दर्शनाला येतात. काहीवेळेस ही संख्या ४ ते ५ लाखांवर जाते. शेकडो वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राम मंदिर संकल्प पूर्ण झाला असून, श्रीराम नवमीच्या दिवशी रामललाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा महासागर लोटू शकतो, यादृष्टीने सर्व गोष्टींची तयारी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. अयोध्या पोलिसांनीही तयारीचा आढावा घेतला आहे. १५ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत २४ तास मंदिर खुले ठेवल्याने अधिकाधिक भाविक रामललाचे दर्शन करू शकतील, असे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राम मंदिराचे संपूर्ण काम लवकरच पूर्ण केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर रामभक्तांना रामललाचे दर्शन सुलभपणे घेता यावे, यासाठी अनेक सोयी, सुविधा, बदल, नियम करण्यात आले. याचा फायदा भाविकांना होत असल्याचे सांगितले जात आहे.