अयोध्येवर तोडगा निघाला, राम मंदिर व मस्जिद बांधणार ?
By admin | Published: February 24, 2015 09:43 AM2015-02-24T09:43:59+5:302015-02-24T09:50:39+5:30
अयोध्येतील ७० एकरच्या जागेवर मंदिर व मस्जिद दोन्ही बांधले जाईल आणि या दोघांच्या मधोमध १०० फूट उंच भिंत बांधून या जागेचे विभाजन केले जाईल यावर दोन्ही पक्षकारांचे एकमत झाले.
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. २४ - अयोध्या येथील वादग्रस्त भूमीवरुन सुरु असलेल्या वादावर तोडगा निघण्याची चिन्हे आहेत. ७० एकरच्या या जागेवर मंदिर व मस्जिद दोन्ही बांधले जाईल आणि या दोघांच्या मधोमध १०० फूट उंच भिंत बांधून या जागेचे विभाजन करण्यावर दोन्ही पक्षकारांचे एकमत झाले आहे.
गेल्या ६५ वर्षांपासून अयोध्या येथील रामजन्मभूमी - बाबरी मस्जीदचा वाद सुरु आहे. या वादावर कोर्टाबाहेर सामोपचाराने काढण्यासाठी सोमवारी मुसलमानांचे पक्षकार हाशिम अन्सारी आणि हिंदूंचे पक्षकार आखाडा परिषदेचे महंत ज्ञान दास यांच्यात बैठक पार पडली. बैठकीविषयी माहिती देताना महंत दास म्हणाले, आम्ही आमच्या प्रस्तावासंदर्भात सर्व हिंदूत्ववादी संघटना आणि प्रमुख अध्यात्मिक गुरुंशी चर्चा केली आहे. त्यांनी आमच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. लवकरच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन आमचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडू असे दास यांनी सांगितले.
अयोध्येतील ७० एकरच्या जागेवर राम मंदिर आणि मस्जिद दोन्ही व्हावे असे आम्हाला वाटते. म्हणूनच ७० एकरच्या या जागेवर राम मंदिर आणि मस्जिद दोन्ही बांधले जाईल असे दास यांनी स्पष्ट केले. भविष्यात यावरुन वाद निर्माण होऊ नये यासाठी मंदिर आणि मस्जिदमध्ये १०० फूट उंच भिंत बांधली जाईल असेही त्यांनी नमूद केले. सध्या चर्चा अंतिम टप्प्यात असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की हा प्रस्ताव सुप्रीम कोर्टासमोर सादर केला जाईल असे दास यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. ऑल इंडिया बाबरी मस्जिद अॅक्शन कमिटीचे संयोजक जफरयाब जिलानी यांनीही अन्सारी आणि कोर्टाच्या भूमिकेवर विश्वास दाखवत अन्सारी कधीच चुकीच्या प्रस्तावाला समर्थन देणार नाही असे नमूद केले.