अयोध्या: कंत्राटदारांना अवाजवी फायदा; ‘कॅग’ने ओढले ताशेरे, १९ कोटींचा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 05:40 AM2023-08-13T05:40:23+5:302023-08-13T05:41:26+5:30
कॅगने जानेवारी २०१५ ते मार्च २०२२ दरम्यान स्वदेश दर्शन योजनेच्या कामगिरीचे ऑडिट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पेन्शन योजनेच्या निधीचा गैरवापर, आयुष्मान भारत योजनेतील त्रुटींनंतर कॅगने अयोध्या विकास प्रकल्पाशी संबंधित नवा खुलासा केला आहे. कॅगने आपल्या लेखापरीक्षण अहवालात अयोध्या विकास प्रकल्पातील कंत्राटदारांना अवाजवी फायदा मिळवून देण्यात आल्याचे म्हटले आहे.
कॅगने जानेवारी २०१५ ते मार्च २०२२ दरम्यान स्वदेश दर्शन योजनेच्या कामगिरीचे ऑडिट केले. यामध्ये कॅगने म्हटले की, या योजनेंतर्गत सहा राज्यांमध्ये सुरू असलेल्या सहा प्रकल्पांतर्गत कंत्राटदारांना १९ कोटी ७३ लाख रुपयांचा अवाजवी लाभ देण्यात आला. गुप्तात घाटाच्या सुरू असलेल्या कामात कंत्राटदारांनी न केलेल्या कामांचे पैसेही देण्यात आल्याचे कॅगने म्हटले आहे.
अनावश्यक खर्च
अहवालात अयोध्या विकास प्रकल्पातील अनावश्यक खर्चाबाबत माहिती आहे. या प्रकल्पात ८ कोटी २२ लाखांचा अनावश्यक खर्च झाला आहे. या अहवालात या प्रकल्पाच्या देखरेख व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.