अयोध्याप्रकरणी लगेच सुनावणीची याचिका फेटाळली; पूजेचा हक्क हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 05:56 AM2018-07-04T05:56:15+5:302018-07-04T05:56:15+5:30
अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिरात पूजेचा माझा मूलभूत अधिकार वापरता यावा या मागणीच्या भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.
नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिरात पूजेचा माझा मूलभूत अधिकार वापरता यावा या मागणीच्या भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने स्वामी यांना या मुद्द्याचा तुम्ही नंतर उल्लेख करा, असे म्हटले.
स्वामी म्हणाले की, ‘नंतर’ हा शब्द खूपच व्यक्तिनिष्ठ असून मी माझी याचिका सुनावणीस घ्या, असे पुन्हा १५ दिवसांनी म्हणेन. पूजा करण्याचा मूलभूत अधिकार बजावता यावा या मागणीवर तातडीने सुनावणी करावी ही स्वामी यांची याचिका न्यायालयाने याआधीही फेटाळली होती. १४ मार्च रोजी विशेष खंडपीठाने चित्रपट दिग्दर्शक शाम बेनेगल व तिस्ता सेटलवाड यांनी अयोध्येतील जमिनीच्या वादात हस्तक्षेप करण्याची याचिका फेटाळली होती. मूळ खटल्यात पक्षकारांनाच फक्त लढता येईल, असेही या खंडपीठाने स्पष्ट केले होते. स्वामी यांच्याच विनंतीवरून हे खटले जलदगती न्यायालयात सुरू आहेत. मुख्य खटल्यात हस्तक्षेपास स्वामी यांनाही न्यायालयाने परवानगी दिली नव्हती. पण खंडपीठाने स्वामी यांचे त्यांना या खटल्यात हस्तक्षेप करायचा नाही हे म्हणणे विचारात घेतले. (वृत्तसंस्था)
मालमत्तेपेक्षा पूजेचा अधिकार महत्त्वाचा
मंदिरात पूजा करण्याचा माझा मूलभूत अधिकार वापरता यावा या मागणीची मी स्वतंत्र याचिका केली होती. पूजेचा अधिकार हा माझा मूलभूत असून तो मालमत्तेच्या अधिकारापेक्षाही मोठा आहे, असे स्वामी याचिकेत म्हणाले होते.