Ayodhya Verdict: आता प्रत्येक भारतीयावरची राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी वाढली - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 06:14 PM2019-11-09T18:14:36+5:302019-11-09T18:17:00+5:30
सर्वोच्च न्यायालयाने हा खटला संयमाने पाहिला आणि निकाल सर्वांच्या संमतीने लागला. देशाचे न्यायाधीश, न्यायालय आणि न्यायप्रणाली अभिनंदनास पात्र आहे.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका महत्वपूर्ण प्रकरणावर निकाल दिला आहे. शेकडो वर्षांचा इतिहास होता. भारताची लोकशाही किती जिवंत आहे हे जगाने पाहिले. देशातील प्रत्येक नागरिकाने खुल्या मनाने निकाल स्वीकार केला आहे. भारत ज्याच्यासाठी ओळखला जातो विविधतेत एकता याचा मी गर्वाने उल्लेख करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने हा खटला संयमाने पाहिला आणि निकाल सर्वांच्या संमतीने लागला. देशाचे न्यायाधीश, न्यायालय आणि न्यायप्रणाली अभिनंदनास पात्र आहेत. 9 नोव्हेंबर हा असा दिवस आहे जेव्हा बर्लिनची भींत कोसळली होती. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या दिशांच्या आहेत. आजची तारीख अयोध्या निकाल आणि करतारपूर कॉरिडॉरसाठी महत्वाची होती, असे मोदी यांनी देशवासियांना संबोधताना म्हटले.
आजच्या दिवसाचा संदेश जोडण्याचा आहे आणि मिळून जगण्याचा आहे. या प्रकरणांवरून कोणाच्या मनात कटुता उरली असेल तर त्याला तिलांजली देण्याचा आजचा दिवस आहे. न्यायालयाने देशाला कठीणातला कठीण विषय संविधानाच्या माध्यमातून सोडविता येतो, असा संदेश दिला आहे.
भारताचे संविधान, न्यायिक प्रणाली यावर आपला विश्वास तसाच रहावा हे महत्वाचे आहे. हा निकाल नवीन पहाट घेऊन आला आहे. या वादाचा अनेक पिढ्यांवर परिणाम झाला होता. मात्र, नव्या पिढीने नवी सुरुवात करावी, नवीन भारताची सुरुवात करावी. माझ्या सोबत चालणारा कुठे मागे तर राहिला नाही ना, याची दक्षता घ्यावी, असेही मोदी म्हणाले.
राम मंदिराच्या निर्मितीचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्याचबरोबर देशाच्या निर्माणाची जबाबदारी आणखी वाढली आहे. प्रत्येक भारतीयाने त्याचे दायित्व, कर्तव्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. भारतासमोर आव्हाने अनेक आहेत. सर्वांनी एकत्र येऊन मात करावी, असे आवाहनही मोदी यांनी देशवासियांना केले.