प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या सजली; शर्कराधिवास, फलाधिवास, पुष्पाधिवासाचे पार पडले विधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 06:56 AM2024-01-21T06:56:21+5:302024-01-21T06:57:04+5:30

सात नद्यांचे पाणी दाखल

Ayodhya was decorated for life prestige; Rituals of ShakaraDhivas, Faladhivas, Puspadhivas | प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या सजली; शर्कराधिवास, फलाधिवास, पुष्पाधिवासाचे पार पडले विधी

प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या सजली; शर्कराधिवास, फलाधिवास, पुष्पाधिवासाचे पार पडले विधी

- त्रियुग नारायण तिवारी

अयोध्या : प्रभू श्रीरामांच्या बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्यानगरी सज्ज होत आहे. उद्या होणाऱ्या सोहळ्यासाठी तयारी पूर्ण होत आली आहे. अनुष्ठानाच्या पाचव्या दिवशी शनिवारी पहाटे शर्कराधिवास, फलाधिवास हे विधी करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी पुष्पाधिवास विधी पार पडला. 

भारतामध्ये सात नद्यांचे विशेष महत्त्व आहे. त्यातील सरस्वती, सिंधू नदीचे पाणी पाकव्याप्त काश्मीरमधून आणण्यात आले आहे. तसेच कावेरी नदीचे पाणीदेखील अयोध्येत पोहोचले आहे. शैव शारदा समितीचे सदस्य मंजूनाथ शर्मा यांनी सांगितले की, भारतात सात नद्यांना महत्त्वाचे स्थान असून त्यातील पाच नद्या भारतात व दोन नद्या पाकिस्तानात आहेत.

पाकिस्तानातून सिंधू, सरस्वती नदीचे पाणी थेट भारतात आणणे शक्य नव्हते. त्यामुळे शैव शारदा कमिटीच्या रवींद्र पंडिता यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील काही नागरिकांशी संपर्क साधला. त्यांना या दोन नद्यांचे पाणी पाठविण्याची विनंती करण्यात आली. त्यांनी पाठविलेले पाणी काही देशांचा प्रवास करून मुंबईत पोहोचले. त्यानंतर हे दोन नद्यांचे पाणी अयोध्येत आणण्यात आले. त्याचप्रमाणे पाकिस्तानातील हिंगलाज शक्तिपीठ येथील जल शनिवारी अयोध्या येथे पोहोचले. 

आज मध्याधिवास, शय्याधिवासाचे विधी
अयोध्येच्या राममंदिरात उद्या, २१ जानेवारी रोजी पहाटे मध्याधिवास, त्याच दिवशी संध्याकाळी शय्याधिवास असे दोन महत्त्वाचे विधी होणार आहेत. त्यानंतर २२ जानेवारीला सोमवारी दुपारी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

कांबळे, गायकवाड दाम्पत्यांसह १४ यजमान
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देशातल्या विविध प्रांतांतील १४ दाम्पत्ये ‘यजमान’ असणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील विठ्ठलराव कांबळे (खारघर) व घुमंतू समाज ट्रस्टचे महादेवराव गायकवाड (लातूर) हे सपत्नीक सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती दिली.

तीर्थक्षेत्रांतील पवित्र जलाचे ८१ कुंभ
देशाच्या विविध तीर्थक्षेत्रांतील पवित्र जलाचे ८१ कुंभ अयोध्येत आणण्यात आले आहेत. या जलाने अयोध्येच्या राममंदिरातील मूर्तीला स्नान घालण्यात येणार असून गाभाऱ्याचे शुद्धीकरण करण्यात येईल.     

Web Title: Ayodhya was decorated for life prestige; Rituals of ShakaraDhivas, Faladhivas, Puspadhivas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.