अयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 09:32 PM2018-11-14T21:32:51+5:302018-11-14T21:34:05+5:30
बाबरी मशीद आणि अयोध्येमध्ये राम मंदीर उभारण्यावरून वाद रंगलेले असताना तेथील 1992 मधील दंगल पाहिलेल्या इक्बाल यांनी अयोध्या सोडण्याचा इशारा दिला आहे.
अयोध्या : बाबरी मशीद आणि अयोध्येमध्ये राम मंदीर उभारण्यावरून वाद रंगलेले असताना तेथील 1992 मधील दंगल पाहिलेल्या इक्बाल यांनी अयोध्या सोडण्याचा इशारा दिला आहे. अयोध्येमध्ये 1992 सारखी गर्दी उसळू शकते. शिवसेना आणि विहिंप यांचा 24-25 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्यक्रमाची धास्ती इक्बाल यांनी घेतली असून दोन दिवसांत सुरक्षा वाढविण्याचे आवाहनही केले आहे.
अयोध्येमध्ये शिवसेनेसह अन्य हिंदू संघटनांनी मेळावे घ्यायचे ठरविले आहेत. यामध्ये आरएसएसही सक्रीय राहणार आहे. रामाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून साधू-संत आणि संघटनांचे कार्यकर्ते येणार आहेत. यासाठी अयोध्येतही तयारी सुरु झाली आहे.
यावरून या कार्यक्रमांना 1992 सारखीच गर्दी उसळण्याची भीती इक्बाल यांनी व्यक्त केली आहे. 6 डिसेंबर, 1992 ला केवळ बाबरी मशीदच पाडली गेली नव्हती तर आसपासचे पुजास्थळ आणि लोकांची घरेही जाळण्यात आली होती. बाबरीच्या संबंधितांनी सांगितले की, आम्हाला आणि येथील मुस्लिम कुटुंबांना जर सुरक्षा पुरविण्यात आली नाही तर तेथून पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही.
मंदिराराठीच्या आंदोलनाला पुनरुज्जीवित करण्यासाठी विहिंपने धर्मसभेचे आयोजन केले आहे. यासाठी अवध प्रांतामधून 25 हजार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची भरती सुरु करण्यात आली आहे. विहिंपच्या प्रांतिक संघटन मंत्री भालेंद्र यांनी सांगितले की, कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु झाली आहे. अवध, कानपूर, गोरक्ष आणि काशी आदी ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणण्यात येणार आहेत. यासाठी कारसेवकपूरममध्ये बैठका सुरु झाल्या आहेत.