संधिवातावर आयुर्वेदाची मात्रा गुणकारी

By Admin | Published: April 5, 2015 01:22 AM2015-04-05T01:22:52+5:302015-04-05T01:22:52+5:30

सांधेदुखी-संधिवातावर आयुर्वेदिक औषधोपचार अत्यंत गुणकारी असल्याच्या निष्कर्षावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एआयआयएमएस) परीक्षणाअंती शिक्कामोर्तब केले आहे.

Ayurveda content on Rheumatoid Arthritis | संधिवातावर आयुर्वेदाची मात्रा गुणकारी

संधिवातावर आयुर्वेदाची मात्रा गुणकारी

googlenewsNext

नवी दिल्ली : आयुर्वेद जगातील प्राचीन वैद्यकीय उपचार पद्धती असून सांधेदुखी-संधिवातावर आयुर्वेदिक औषधोपचार अत्यंत गुणकारी असल्याच्या निष्कर्षावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एआयआयएमएस) परीक्षणाअंती शिक्कामोर्तब केले आहे.
वाढत्या वयात सांधेदुखीमुळे अनेकांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. आयुर्वेदात सांगितलेले औषधोपचार सांधेदुखी-संधिवातावर खरेच परिणामकारक आहेत का? यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने सांधेदुखीने त्रस्त असलेल्या १२५ रुग्णांचे शास्त्रोक्त परीक्षण केले असता अश्वगंधा चूर्ण, सिद्ध मकरध्वजच्या सेवनाने वेदना आणि सूज यापासून दिलासा मिळतो. तसेच सांध्यांची हालचालही सहजगत्या होत असल्याचे आढळून आले आहे. वनस्पतीजन्य पदार्थ आणि खनिजद्रव्याच्या मिश्रणातून अश्वगंधा चूर्ण आणि सिद्ध मकरध्वज हे औषधी घटक तयार केले जातात. पारंपरिक वैद्यकीय चिकित्सा पद्धतीतील उपचारांना प्रमाणित करण्याच्या एक भाग म्हणून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीने हा संशोधनात्मक अभ्यास करण्यात आला. अपस्मार (इलिप्सी), अल्झायमर (स्मृतिभ्रंश) व हृदयविकारावरील पर्यायी उपचारांना प्रमाणित करण्यासाठीही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अभ्यास करीत आहे, असे एम्सच्या औषधीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. वाय. के. गुप्ता यांनी सांगितले. दुष्परिणाम होत नाहीत, तसेच आर्थिकदृष्ट्याही परवडणारी औषधे असल्याने अनेक जण पारंपरिक वैद्यकीय चिकित्सा पद्धतीत स्वारस्य दाखवीत आहेत. याशिवाय केंद्र सरकारही यासाठी प्रोत्साहन देत आहे. हळद, शंखपुष्पी, अर्जुनारिष्टच्या गुणकारी तत्त्वांचा अभ्यास करून त्यांच्या औषधीमूल्यांना प्रमाणित करण्याबाबतही एम्स संशोधन करीत आहे.

वेदनाशामक, तणाव कमी करणारे आणि प्रतिकारशक्तीला पूरक असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांच्या शारीरिक हालचाली सुधारण्यास अश्वगंधा चूर्ण गुणकारी असल्याचेही एम्सच्या डॉक्टरांनी म्हटले आहे.

Web Title: Ayurveda content on Rheumatoid Arthritis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.