देशभरातील आयुर्वेदिक डॉक्टरांचा आज ‘एल्गार’, दिल्लीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:26 AM2017-11-06T03:26:15+5:302017-11-06T03:26:27+5:30
‘जीएसटी’मधून आयुर्वेदिक औषधांना वगळावे, एनसीआयएसएम (नॅशनल कमिशन फॉर इंडियन सीस्टिम आॅफ मेडिसिन) या विधेयकातून ‘इंटिग्रेटेड’ हा शब्द काढून टाकावा व इतर मागण्यांकरिता देशभरातील हजारो
सुमेध बनसोड
नवी दिल्ली : ‘जीएसटी’मधून आयुर्वेदिक औषधांना वगळावे, एनसीआयएसएम (नॅशनल कमिशन फॉर इंडियन सीस्टिम आॅफ मेडिसिन) या विधेयकातून ‘इंटिग्रेटेड’ हा शब्द काढून टाकावा व इतर मागण्यांकरिता देशभरातील हजारो आयुर्वेदिक डॉक्टर राजधानी दिल्लीत एकदिवसीय आंदोलन करणार असल्याची माहिती नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) दिली आहे.
सोमवारी सकाळी जुन्या दिल्लीतील शांती देसाई स्पोर्ट्स क्लब येथून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता चांदणी चौकमार्गे जाऊन महात्मा गांधींच्या राजघाट येथील समाधीस्थळी मोर्चाचे विसर्जन होईल.
आपल्या मागण्यांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून ‘निमा’ संघर्ष करत आहे. २०१७च्या विधेयकात समन्वयात्मक उपचार पद्धती असावी, आयएसएम डॉक्टरांना कायद्याचे अधिकतर व सुरक्षा मिळावी, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ‘एमबीबीएसप्रमाणे विद्यावेतन द्यावे, शिवाय ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट’मध्ये सुधारणा करावी, या आंदोलकर्त्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या इतर मागण्या आहेत. आयुर्वेदिक डॉक्टरांना आपत्कालीन स्थितीत ‘अॅलोपथी’ची औषधे वापरण्याची अनुमती असते.
अभ्यासक्रमातदेखील आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपथी औषध वापरण्याचे धडे दिले जातात. ‘इंटिग्रेटेड’ हा शब्द विधेयकात वापरण्यात आल्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांना औषध उपचार करता येणार नाही. आयुर्वेदिक डॉक्टरांवर
हा अन्याय आहे, अशी डॉक्टरांची भूमिका आहे.