आयुर्वेदिक डॉक्टरांनाही अॅलोपथीची मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 02:19 AM2017-12-31T02:19:22+5:302017-12-31T02:19:35+5:30
आयुर्वेद आणि होमिओपथी यांसह भारतीय वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना एक जोड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आंग्लवैद्यकाचा (अॅलोपथी) व्यवसाय करण्याची मुभा देण्याची तरतूद असलेले एक विधेयक संसदेत मांडण्यात आले आहे.
नवी दिल्ली : आयुर्वेद आणि होमिओपथी यांसह भारतीय वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना एक जोड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आंग्लवैद्यकाचा (अॅलोपथी) व्यवसाय करण्याची मुभा देण्याची तरतूद असलेले एक विधेयक संसदेत मांडण्यात आले आहे.
वैद्यक व्यवसायाचे नियन करणारी सध्याची ‘मेडिक कौन्सिल आॅफ इंडिया’ (एमसीआय) मोडीत काढून त्याऐवजी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्याच्या कायद्याचे हे विधेयक सरकारने शुक्रवारी लोकसभेत मांडले.
होमिओपथी, भारतीय वैद्यक आणि आंग्लवैद्यक यांच्यात देवाणघेवाण होऊन समन्वय वाढावा यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग,केंद्रीय होमिओपथ कौन्सिल व भारतीय वैद्यकाची केंद्रीय
परिषद यांची वर्षातून किमान एकदा संयुक्त बैठक घेण्याची तरतूद या विधेयकात आहे.
अशा संयुक्त बैठकांमध्ये होमिओपथी व भारतीय वैद्यकाच्या पदवीधरांना आधुनिक वैद्यकाचाही व्यवसाय करू देण्यासाठी कोणत्या प्रकारचे जोड अभ्यासक्रम असावेत याचा तसेच असा अभ्यासक्रम पूर्ण करणाºयांना अॅलोपथीचा व्यवसाय कसा व कितपत करू द्यायचा यावर बहुमताने निर्णय घेता येईल, असेही ही प्रस्तावित कायदा म्हणतो.
विधेयकातील तरतुदी
सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश सामायिक प्रवेश परीक्षेने
पदवी घेतल्यानंतरही व्यवासायाची सनद मिळण्यासाठी स्वतंत्र परीक्षा.
राष्ट्रीय वैद्यकीय सल्लागार परिषदेची स्थापना.
या परिषदेवर प्रत्येक राज्याचा, विद्यापीठ अनुदान आयोगाचा व राष्ट्रीय गुणवत्ता व पात्रता निर्धारण प्राधिकरणाचा प्रतिनिधी
वैद्यकीय महाविद्यालयांना विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी वेगळ््या मंजुरीची गरज नाही.