जीएसटीमुळे आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधे १२ टक्के महागणार
By admin | Published: June 30, 2017 12:31 AM2017-06-30T00:31:28+5:302017-06-30T00:31:28+5:30
वस्तू आणि सेवा करप्रणाली (जीएसटी) १ जुलैपासून लागू होणार असल्याने, काय महागणार आणि काय स्वस्त होणार, याची चर्चा सुरू आहे.
कोची : वस्तू आणि सेवा करप्रणाली (जीएसटी) १ जुलैपासून लागू होणार असल्याने, काय महागणार आणि काय स्वस्त होणार, याची चर्चा सुरू आहे. पण जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधे १२ टक्क्यांनी महागणार आहेत. यामुळे औषधी उत्पादक आणि किरकोळ दुकानदारांत नाराजी आहे.
आयुर्वेद, योग, युनानी, नैसर्गिक आणि होमिओपॅथी या उपचार पद्धतींचा संशोधन विकास करणे आणि या पारंपरिक वैद्यकीय उपचार पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आयुष मंत्रालयाची स्थापना केली. जीएसटीमुळे ही औषधे महागणार असल्याने भारतीय औषधे उत्पादक संघटनेने (एमएमओआय) आयुष मंत्रालयाकडे धाव घेत जेनेरिक औषधींवरील कर न लावण्याची तसेच उत्पादन मालकीवर ५ टक्के कर लावण्याचे साकडे घातले आहे. सध्या जेनेरिक औषधांवर २ टक्के आणि उत्पादन मालकीवर ६ टक्के कर
आहे.
सरकारने जेनेरिक औषधे आणि औषधोत्पादन मालकीवर १२ टक्के जीएसटी निश्चित केला. आयुर्वेदिक प्रसाधने, साबणावर १८ टक्के कर निश्चित केला आहे, असे एमएमओआयचे सरचिटणीस डॉ. डी. रामनाथन यांनी सांगितले. जुने आजार बरे करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे दीर्घकाळ घ्यावी लागतात. उदा. धनुर्वातासाठीच्या तेलाची ४५० मिली लीटर बाटलीची किंमत ३५० रुपयांहून अधिक आहे. १० ते १५ दिवस ती पुरते.
वृद्धत्वामुळे निर्माण होणाऱ्या व्याधींसाठी नियमित औषधे घेणाऱ्यांचा खर्च सरकारने वाढवू नये. चढ्या करामुळे किमती वाढणार असल्याने गरीब, गरजूंना औषधोपचार परवडणार नाहीत.
अनियमित पुरवठ्यामुळे कच्च्या मालाचा भाव १०० ते २०० टक्क्यांनी वाढला आहे. धनुर्वात तेल, महारसनाडी काश्यम, अगस्त्य रसायन, अष्टचूर्ण, त्रिफळाचूर्ण यांसारख्या औषधांवर कर आकारलाच जाऊ नये, असे एमएमओआयचे म्हणणे आहे. केरळातील केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचा (एकेसीडीए) असा दावा आहे की, औषधी दुकानांतील ९० टक्के औषधे १२ टक्क्यांनी महागतील. निरोध, गर्भनिरोधक, रक्तद्रव आणि मूत्रपिंड रक्तशुद्धीकरण यासाठी लागणाऱ्या इंजेक्शन्सवर ५ टक्के कर असेल.
औषधशास्त्रात या औषधांचे प्रमाणही अत्यल्प आहे, असे एकेसीडीएचे प्रदेशाध्यक्ष ए. एन. मोहन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)