‘आयुष’ मंत्रालय वर्षभर शवासनात!
By admin | Published: June 1, 2015 05:14 AM2015-06-01T05:14:42+5:302015-06-01T05:14:42+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी २६ मे रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच आयुर्वेद आणि योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘आयुष’ या नव्या खास मंत्रालयाची घोषणा केली.
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी २६ मे रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच आयुर्वेद आणि योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘आयुष’ या नव्या खास मंत्रालयाची घोषणा केली. या मंत्रालयाचा मोठा गाजावाजा झाला; मात्र वर्षभरात निष्प्रभ कामगिरीचा नवा उच्चांक म्हणावा अशीच या मंत्रालयाची स्थिती असल्याची माहिती प्रकाशात आली आहे.
मोदींनी २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ घोषित करून योगाला जागतिक स्तरावर चालना देताना आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला खरा; मात्र प्रत्यक्षात मोदींच्याच कल्पनेतून आकाराला आलेल्या आयुष मंत्रालयाने ४८ टक्क्यांपेक्षा कमीच निधी उपयोगात आणला असल्याचे धक्कादायक तथ्य समोर आले आहे.
गेले १० दिवस मोदी सरकार सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांमध्ये वर्षभरातील आपल्या कामगिरीचा जोरदार डंका पिटत आहे. मात्र स्वत: मोदी यांच्या लाडक्या ‘आयुष’ मंत्रालयाची ढळढळीत अकार्यक्षमता यात प्रयत्नपूर्वक दडविण्यात आली आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात आयुष मंत्रालयाला वितरित करण्यात आलेल्या १,२७२ कोटी रुपयांपैकी या मंत्रालयाने ६०७ कोटी रुपयांचा निधी वापर न करताच वित्त मंत्रालयाकडे परत पाठविला आहे. मोदी सरकारमधील कोणत्याही मंत्रालयाने निधी खर्च न करता परत पाठविण्याचा हा नवा उच्चांक आहे. मोदींनी खास विश्वासू श्रीपाद नायक या ज्येष्ठ नेत्याकडे या मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपविला असताना असे घडावे, हे अधिकच लक्षवेधी आहे. यापूर्वी ‘आयुष’ हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत केवळ एक विभाग होता. नायक हे आरोग्य राज्यमंत्री आहेत.