आता 'आयुष्यमान भारत'वरुन घमासान; आप-भाजपामध्ये पुन्हा तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 11:48 AM2018-08-30T11:48:15+5:302018-08-30T11:49:28+5:30
केजरीवाल सरकारच्या मागणीमुळे पुन्हा संघर्ष पेटणार
नवी दिल्ली: आम आदमी पार्टी आणि भाजपा यांच्यातील संघर्षामुळे दिल्लीतील जनता 'आयुष्यमान भारत' योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्राच्या 'आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने'वरुन आप-भाजपामध्ये वादाची नवी ठिणगी पडली आहे. 25 सप्टेंबरपासून ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात येत आहे. मात्र या योजनेच्या नावावरुन आता मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संघर्ष काही नवा नाही. 'आयुष्यमान भारत'वरुन या संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. आयुष्यमान भारत या योजनेच्या नावात प्रधानमंत्री जन आरोग्य असा उल्लेख आहे. मात्र दिल्लीत ही योजना लागू करताना तिचं नाव 'आयुष्यमान भारत-मुख्यमंत्री जन आरोग्य' असावं, अशी दिल्लीमधील आप सरकारची मागणी असल्याचं वृत्त मेल टुडेनं दिलं आहे. तर 'आयुष्यमान भारत' या नावानं ही योजना दिल्लीत लागू करा आणि त्यानंतर पुढील गोष्टींवर चर्चा करता येईल, अशी केंद्राची भूमिका आहे. त्यामुळे आप आणि भाजपामध्ये पुन्हा संघर्ष पेटला आहे.
योजनेचं नाव हे भाजपा आणि आपमधील नव्या संघर्षामागील एकमेव कारण नाही. केंद्राच्या सर्वेक्षणानुसार दिल्लीतील 20 लाख नागरिक या योजनेचे लाभार्थी ठरतात. मात्र दिल्लीतील 50 लाख लोकांचा समावेश या योजनेत केला जावा, अशी आप सरकारची मागणी आहे. ही मागणी मान्य होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन आधीच दिल्ली आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष पेटला आहे. त्यात आता 'आयुष्यमान भारत'ची भर पडली आहे. मात्र यामुळे दिल्लीकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.