‘आयुष्यमान’चा समाजातील शेवटच्या घटकाला लाभ - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 03:52 AM2018-09-24T03:52:34+5:302018-09-24T03:52:39+5:30
आयुष्यमान भारत मिशन हे खऱ्या अर्थाने ‘एक भारत’ आणि सर्वांना समान उपचार पद्धतीच्या भावनेने समाजातील अखेरच्या रांगेत उभ्या व्यक्तीला चांगल्या आरोग्य सेवा सुनिश्चित करणारी योजना असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे रविवारी स्पष्ट केले.
रांची : आयुष्यमान भारत मिशन हे खऱ्या अर्थाने ‘एक भारत’ आणि सर्वांना समान उपचार पद्धतीच्या भावनेने समाजातील अखेरच्या रांगेत उभ्या व्यक्तीला चांगल्या आरोग्य सेवा सुनिश्चित करणारी योजना असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे रविवारी स्पष्ट केले.
स्थानिक प्रभात तारा मैदानावर आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ करताना ते म्हणाले की, या योजनेत धर्म-संप्रदाय, जाती, उच्च-नीच असा भेदभाव असणार नाही. कोणत्याही जातीची, घटकाची किंवा संप्रदायाची व्यक्ती असो आरोग्य सेवा देताना भेदभाव होणार नाही. सर्वांना आरोग्य योजनेचा लाभ मिळणार असल्याची ग्वाही देतानाच त्यांनी हाच ‘सबका साथ, सबका विकास’ असल्याचे नमूद केले.
देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकांनी ‘गरिबी हटाओ’चे नारे ऐकले. गरिबांच्या नावावर राजकारण करण्याऐवजी गरिबांच्या सशक्तीकरणावर भर दिला गेला असता तर देशाची आज ही स्थिती राहिली नसती. दरम्यान, मोदी यांनी चैबासा आणि कादेरमा येथे दोन वैद्यकीय महाविद्यालयांचा शिलान्यास केला.
जगातील सर्वात मोठी योजना...
देशातील ५० कोटींपेक्षा जास्त लोकांना ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा योजनेचा लाभ देणारी आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या संपूर्ण युरोपीय संघाच्या एकूण लोकसंख्येएवढी आहे. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या तीन देशांची एकूण लोकसंख्या जोडली तरी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या जवळपास जाणारी असेल. या योजनेचा पहिला टप्पा एप्रिलमध्ये सुरू करण्यात आला, त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती. याच मालिकेत पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली त्यावेळी दीनदयाल उपाध्याय यांची जयंती होती. त्यामुळे आयुष्यमान भारत योजनेचे दोन महापुरुषांशी नाते आहे, असा उल्लेखही मोदींनी केला. (वृत्तसंस्था)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आयुष्यमान भारत योजना ऐतिहासिक असून, या योजनेने देशातील गरिबांना सन्मानाने जगण्याचा अधिकार बहाल करण्याचे काम केले आहे. भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. - अमित शहा, भाजपचे अध्यक्ष.
काय आहेत वैशिष्ट्ये....
या योजनेशी जोडली गेलेली व्यक्ती कोणत्याही राज्यात या योजनेचा लाभ घेऊ शकेल.
आतापर्यंत देशभरातील १३ हजारावर रुग्णालये जोडली गेली आहेत.
कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंड, यकृत, मधुमेहासह एकूण १३०० पेक्षा जास्त आजारांवर इलाज.
गंभीर आजारांवर केवळ सरकारीच नव्हे तर खासगी रुग्णालयांमध्येही उपचार.
एकूण ५ लाखापर्यंत खर्चाची तरतूद राहणार असून तपासणी, औषधे आणि रुग्णालयात दाखल होण्यासह त्यापूर्वीचा खर्चही समाविष्ट असेल. आधीपासून कोणताही आजार असेल तर त्यावरील खर्चही जोडला जाईल.
१४५५५ या नंबरवर फोन करून नजीकच्या सामान्य सेवा केंद्रातून या योजनांची माहिती मिळवता येईल.
मोदींनी रांचीमध्ये १० वेलनेस सेंटर्सचा शुभारंभ केला. झारखंडमध्ये अशी ४० केंद्रे कार्यरत असून, देशभरातील संख्या २३०० च्या घरात गेली आहे.