आता दिल्लीत १० लाखांपर्यंतचे उपचार मिळणार मोफत; जाणून घ्या आयुष्मान कार्ड कसे बनवायचे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:26 IST2025-02-21T13:25:27+5:302025-02-21T13:26:33+5:30
Ayushman Bharat Yojana : शपथविधी सोहळ्यानंतर दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाने दिल्लीत आयुष्मान योजना लागू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

आता दिल्लीत १० लाखांपर्यंतचे उपचार मिळणार मोफत; जाणून घ्या आयुष्मान कार्ड कसे बनवायचे?
Delhi Ayushman Card : नवी दिल्ली : दिल्लीत नुकतेच भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने सरकार स्थापन झाल्यानंतर आयुष्मान भारत योजनेअंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार नागरिकांना दिले जातील, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शपथ घेतल्यानंतर काही तासांतच आपल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत या आयुष्मान भारत योजनेला मंजुरी दिली आहे. आता दिल्लीतही जन आरोग्य योजना लागू केली जाणार आहे. याअंतर्गत, १ लाख लोकांसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड बनवले जातील.
आयुष्मान भारत योजना अद्याप दिल्लीत लागू झालेली नव्हती. मागील केजरीवाल सरकारने ही योजना लागू केली नव्हती. दरम्यान, आता केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेसंबंधी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण दिल्लीत सुरू केले आहे. दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांना दिल्लीतील लोकांसाठी आयुष्मान भारत कार्ड कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे, कालच शपथविधी सोहळ्यानंतर दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाने दिल्लीत आयुष्मान योजना लागू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
दिल्लीकरांना होणार डबल लाभ
आयुष्मान कार्ड बनवल्यानंतर, कार्डधारकाला दरवर्षी ५ लाख रुपयांचे मोफत उपचार दिले जातात. कार्डधारक नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये या उपचारांचा लाभ घेऊ शकतात, ज्याचा संपूर्ण खर्च सरकार करते. यामध्ये दिल्ली सरकारकडून ५ लाख रुपयांचे आणि केंद्र सरकारकडून ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा देण्यात येईल. म्हणजेच, देशातील उर्वरित भागात, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. दिल्लीत आयुष्मान भारत योजना लागू झाल्यानंतर दिल्लीकरांना ५ लाख रुपयांच्या डबल लाभ मिळणार म्हणजेच १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील.
आयुष्मान कसे कार्ड बनवायचे?
जर तुम्हाला तुमचे आयुष्मान कार्ड बनवायचे असेल तर आधी तुम्ही पात्र आहात की नाही हे तपासावे लागेल. यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmjay.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला येथे 'Am I Eligible' या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला येथे तुमचा 10 अंकी मोबाइल क्रमांक भरावा लागेल ज्यावर OTP येईल. आता हा OTP आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड भरून लॉगिन करा. यानंतर योजना निवडून आपलं राज्य आणि तुमचा जिल्हा निवडा. यानंतर, 'Search By' वर जा आणि आधार सारखे कोणतेही एक दस्तऐवज निवडा आणि नंतर तुमचा आधार क्रमांक भरा आणि कॅप्चा देखील प्रविष्ट करा.
आता सर्च वर क्लिक केल्यानंतर तुम्ही पात्र आहात की नाही हे समजेल. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही आयुष्मान कार्ड बनवू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊ शकता.संबंधित अधिकारी तुमची पात्रता तपासून काही कागपत्रांची मागणी करेल. त्यानंतर ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होते. अर्ज केल्यानंतर, तुमचे आयुष्मान कार्ड काही वेळात तयार होईल जे तुम्हाला डाउनलोड करावे लागेल.यानंतर, या कार्डद्वारे तुम्ही योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयात दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेऊ शकता.
कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- आधार कार्ड
- रेशन कार्ड किंवा कुटुंब ओळखपत्र (पीपीपी आयडी)
- मोबाईल नंबर
- पात्रता यादीतील नाव
- जात प्रमाणपत्र (राखीव प्रवर्गातून असल्यास)
- उत्पन्नाचा दाखला
- कुटुंबाच्या सध्याच्या स्थितीशी संबंधित कागदपत्रे