मोदींच्या हस्तक्षेपाची आझाद यांची मागणी

By admin | Published: December 25, 2015 12:54 AM2015-12-25T00:54:36+5:302015-12-25T00:54:36+5:30

दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचाराचा(डीडीसीए) मुद्दा उपस्थित केल्यामुळे निलंबित करण्यात आलेले भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी मी काय चूक केली ते सांगा?

Azad's demand for Modi's intervention | मोदींच्या हस्तक्षेपाची आझाद यांची मागणी

मोदींच्या हस्तक्षेपाची आझाद यांची मागणी

Next

नवी दिल्ली : दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचाराचा(डीडीसीए) मुद्दा उपस्थित केल्यामुळे निलंबित करण्यात आलेले भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी मी काय चूक केली ते सांगा? असा थेट सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांताकुमार आणि यशवंत सिन्हा यांनी गुरुवारी बैठक घेत आझाद यांचे निलंबन आणि पक्षनेतृत्वासंबंधी मुद्यांवर चर्चा केली. पक्षातील बुजुर्ग नेते पुन्हा सक्रिय होत असल्याचे संकेत त्यातून मिळाले आहेत.
माझा लढा डीडीसीएमधील भ्रष्टाचाराशी आहे. वैयक्तिक पातळीवर कुणाशीही नाही, असे बिहारमधील दरभंगा येथील खासदार असलेल्या आझाद यांनी अहमदाबाद येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाच्या निगराणीखाली तपासाची मागणी करण्याचे संकेतही दिले आहेत. पंतप्रधान माझी विनंती ऐकून घेतील अशी आशा आहे. पक्षातील ज्येष्ठांचा समावेश असलेल्या मार्गदर्शक मंडळानेही समोर येत या मुद्याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या आझाद यांच्याविरुद्ध भाजपने बुधवारी निलंबनाचा व्हीप जारी करताच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जेटलींची प्रतिष्ठा घालवण्यासाठी आझाद यांनी काँग्रेस आणि आपशी हातमिळवणी केल्याचा आरोप होत आहे. मला पक्षाकडून निलंबनाची नोटीस मिळाली असली तरी विशिष्ट कारणे स्पष्ट केलेली नाहीत. मी पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतलो आहे असे म्हणायचे आहे काय? माझा नेमका दोष काय? मी पक्षाविरुद्ध काहीही केलेले नाही. मी केवळ डीडीसीएमधील भ्रष्टाचाराबद्दल बोललो. मोदी माझी विनंती ऐकून घेतील आणि मला न्याय देतील, अशी मला आशा आहे, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असे आझाद म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
> मी काय चूक केली याचे उत्तर हवे आहे...
भाजप आणि रा.स्व. संघाने नेहमीच भ्रष्टाचार उखडून टाकण्याची भाषा केली आहे. महात्मा गांधी यांच्या मार्गावर चालण्याबाबत आम्ही बोलतो. त्यामुळेच या मुद्यावर मी मोदींच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणाच्या खोलात जावे. मी काय चूक केली याचे विशिष्ट असे उत्तर हवे आहे, असेही त्यांनी नमूद केले. गुरुवारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आझाद यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.
... तर सीबीआयची पंचाईत होईल
डीडीसीएला नोटीस जारी करू नये. अशा नोटिसीनंतर फाईल गहाळ होतात. उद्या मला न्यायालयीन निगराणीत तपासाची मागणी करण्यासाठी न्यायालयात जायचे झाल्यास, सीबीआयची पंचाईत होईल, असे सांगत आझाद यांनी फायली गहाळ होण्याच्या गंभीर मुद्याकडे लक्ष वेधले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मला निलंबनाच्या नोटिसीबाबत उत्तर सादर करण्यासाठी मदतीची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
अडवाणी गटाची बैठक
बिहारमधील पराभवानंतर अडवाणी गटाने १० नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला निवेदन जारी करीत पक्षातील असंतोषाला तोंड फोडले होते. गुरुवारी या गटाने घेतलेल्या बैठकीनंतर कोणतेही निवेदन किंवा जाहीर भाष्य केलेले नाही. याउलट योग्य वेळी, योग्य व्यासपीठावर हा मुद्दा मांडला जाईल असे स्पष्ट केले.
जेटलींसंबंधी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर चर्चा झाली काय? या प्रश्नावर एका ज्येष्ठ नेत्याने ‘अर्थातच’ एवढे उत्तर देत पार्श्वभूमीकडे अंगुलीनिर्देश केला. अडवाणी, शांता कुमार आणि यशवंत सिन्हा यांनी मुरलीमनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जवळजवळ तासभर चर्चा केली. आम्ही भेटलो, चहा घेतला असे सांगत शांताकुमार यांनी भाष्य टाळले. बिहारमधील पराभवानंतर या चार नेत्यांनी मोदी आणि शहा या जोडगोळीवर थेट हल्ला करीत पराभवाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारे निवेदन जारी केले होते.
आझाद यांच्या निलंबनावरून मोदींवर टीका
लखनौ : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) मधील घोटाळ्यावरून वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याविरुद्ध मोहीम उघडणारे भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित केल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रखर टीका केली आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा,’ या मोदी यांच्या निवडणूक नाऱ्याचे त्यांना स्मरण करून देत, डीडीसीए घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली.
‘निवडणूक प्रचारात मोदी भ्रष्टाचार व घोटाळ्यांबद्दल बोलले. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असे ते वारंवार सांगत होते; पण आता घोटाळे घडत आहेत आणि नुकताच डीडीसीए घोटाळा घडला आहे. या घोटाळ्याविरुद्ध आवाज उठविणाऱ्या खासदाराला निलंबित करण्यात आले आहे,’ असे राहुल म्हणाले. अमेठीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावरून दिल्लीला परतताना ते लखनौ येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा, असे सांगणारे मोदी आज मौन पाळून आहेत. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी होऊ लागला आहे, असेही ते म्हणाले.

मोदींनी कारवाई केली पाहिजे आणि जेटली हे १३ वर्षांपर्यंत अध्यक्ष राहिलेल्या डीडीसीएतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले पाहिजेत, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी वाढत्या महागाईवरून मोदींवर टीकास्त्र सोडले. महागाई वाढत असताना मोदी वारंवार परदेश दौरा करतात. या दौऱ्याने देशाचा कोणता फायदा होणार, असा सवाल त्यांनी केला. (वृत्तसंस्था)

Web Title: Azad's demand for Modi's intervention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.