'आँखो में आँखे डालना' महागात पडणार; माफी न मागितल्यास आझम खान यांच्यावर कारवाई होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 05:43 PM2019-07-26T17:43:42+5:302019-07-26T17:52:01+5:30
भाजपाच्या महिला खासदाराबद्दल केलं होतं वादग्रस्त विधान
नवी दिल्ली: लोकसभेतील कामकाजादरम्यान अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या भाजपा खासदार रमा देवी यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त विधान समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांना महागात पडणार आहे. या प्रकरणी आज विरोधी पक्षातील मुख्य नेत्यांसोबत आज लोकसभा अध्यक्षांनी चर्चा केली. खान यांनी सभागृहात रमा देवी यांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
लोकसभेत काल (शुक्रवार) आझम खान यांनी केलेल्या विधानानं मोठा वाद झाला. याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विविध पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला अधीर रंजन चौधरी, जयदेव गल्ला, दानिश अली, सुप्रिया सुळे आणि अन्य नेते उपस्थित होते. आझम खान यांनी त्यांच्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी, त्यांनी माफी मागण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जावी, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
Lok Sabha Speaker Om Birla today met opposition leaders Adhir Ranjan Chowdhury, Jayadev Galla, Danish Ali, Supriya Sule, and others over Samajwadi Party MP, Azam Khan's remark on BJP MP Rama Devi. (file pic) pic.twitter.com/0D24cgEfWA
— ANI (@ANI) July 26, 2019
नेमकं काय घडलं होतं?
लोकसभेत चर्चा सुरू असताना रामपूर मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या निवडून आलेले खान बोलायला उभे राहिले. त्यांनी ‘तू इधर-उधर की ना बात कर…’ असा शेर म्हणत बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या भाजपा खासदार रमा देवी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. 'आप मुझे इतनी लगती है की मेरा मन करता है की आप की आँखो में आँखे डाले रहूँ' असं आझम खान यांनी म्हणताच लोकसभेत गदारोळ झाला. भाजपाच्या खासदारांनी खान यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यानंतरही खान त्यांच्या विधानावर ठाम राहिले. माझं विधान सदनाच्या कामकाजाच्या दृष्टीनं चुकीचं असल्यास मी राजीनामा द्यायला तयार असल्याचं म्हणत ते सदनातून निघून गेले होते.