ना रुग्णवाहिका, ना स्ट्रेचर... आईला उचलून घेऊन लेक पोहोचला रुग्णालयात, सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 04:36 PM2023-12-11T16:36:28+5:302023-12-11T16:45:31+5:30
स्ट्रेचर न मिळाल्याने एका मुलावर आईला उचलून घेऊन डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची वेळ आली आहे.
उत्तर प्रदेशच्या आझमगड जिल्ह्यात स्ट्रेचर न मिळाल्याने एका मुलावर आईला उचलून घेऊन डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची वेळ आली आहे. रुग्णालयाच्या मेन गेटपासून डॉक्टरांपर्यंत आईला नेण्यासाठी त्याला कोणतीही सरकारी मदत मिळाली नाही. त्याने घरातून देखील आईला उचलून आणलं होतं कारण त्याच्याकडे ऑटोसाठी पैसे नव्हते. मात्र, या प्रकरणात सीएमओने स्ट्रेचर असल्याचं म्हटलं आहे. तसेच निष्काळजीपणावर कारवाई केली जाईल असंही सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, सिधारी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ऊंची गोदाम गावात राहणाऱ्या मीना या वृद्ध महिलेच्या पायाला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने महिलेवर योग्य उपचार होऊ शकले नाहीत. यामध्ये तिच्या पायाची अवस्था आणखी वाईट झाली आणि प्रकृती देखील खालावू लागली.
मुलगा रवी आईला दवाखान्यात नेण्यासाठी घरातून निघाला. मात्र पैशांअभावी तो ऑटोने येऊ शकला नाही. त्याने आईला उचललं आणि रुग्णालयात आणलं. पण तिथेही स्ट्रेचर मिळाला नाही. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तरुणाची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट आहे की त्याच्याकडे मोबाईलही नव्हता. यामुळे तो रुग्णवाहिकेलाही बोलवू शकला नाही.
तरुणाने लोकांकडे मदत मागितली असता त्याला कोणीही मदत केली नाही. त्यामुळे त्याला त्याच्या आजारी आईला असंच उचलून रुग्णालयात आणावं लागलं. रुग्णालयात स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने पुन्हा तिला डॉक्टरांकडे आणि वॉर्डात उचलूनच न्यावं लागलं. रुग्णालयात भोंगळ कारभार असल्याचं म्हटलं आहे.
या प्रकरणी सीएमओ आझमगडचे म्हणणे आहे की, रुग्णालयात पुरेशा प्रमाणात स्ट्रेचर आहेत. रुग्णाला जे काही हवे असेल ते तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. मी वेळोवेळी पाहणीही करतो. असे असतानाही असा निष्काळजीपणा झाला असेल तर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असंही सांगितलं.