बी. एस. येदीयुरप्पांना हायकमांडचा दणका? मुलाला तिकीट मिळण्याची शक्यता कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 06:17 AM2023-03-17T06:17:43+5:302023-03-17T06:18:37+5:30
भाजपने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांना स्पष्ट संदेश दिला आहे की, राज्यात त्यांच्या मर्जीने तिकीटवाटप होणार नाही.
हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भाजपला आपल्याच पक्षातील ज्या ४ दिग्गज नेत्यांना सामोरे जावे लागणार आहे, त्यापैकी कर्नाटकमध्ये एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणुका होत असून, तेथे पहिले पाऊल टाकलेले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमधील निवडणुका वर्षाअखेरीस होणार असल्याने वसुंधराराजे शिंदे, शिवराजसिंह चौहान व रमण सिंह यांसारख्या दिग्गज नेत्यांबद्दल अद्याप मौन बाळगलेले आहे. परंतु कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांना स्पष्ट संदेश दिला आहे की, राज्यात त्यांच्या मर्जीने तिकीटवाटप होणार नाही. त्याचबरोबर उमेदवार निवडीचा अधिकार सर्वस्वी त्यांच्यावर सोडला जाणार नाही, हेही पक्षाने स्पष्ट केले आहे.
दिग्गज लिंगायत नेत्याला भाजपने संसदीय मंडळात स्थान देऊन शांत केलेले आहे. तरीही राज्य सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर जनभावना असल्याची जाणीव आहे. अंतर्गत सर्वेक्षण आणि अनेक अहवाल नेतृत्वासाठी चिंताजनक आहेत. परंतु त्याच वेळी पक्ष येदीयुरप्पांना तिकीट वाटपात मनमानी करू देणार नाही, हेही स्पष्टपणे दिसत आहे.
याच कारणामुळे तिकीट वाटपाचा निर्णय कुणाच्याही स्वयंपाकघरात किंवा घरात होणार नाही, असे भाजपचे सरचिटणीस व कर्नाटकचे प्रभारी सी. टी. रवी यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने येदीयुरप्पांच्या समर्थकांना धक्का बसला आहे.
आपला मुलगा बी. वाय. विजयेंद्र हा शिकारीपुरा येथून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे, अशी येदीयुरप्पांनी घोषणा केली असून, त्यावर हायकमांड नाराज आहे. रवी यांच्या वक्तव्यामुळे येदीयुरप्पांचे विरोधक आनंदित झाले आहेत आणि येदीयुरप्पांच्या एकाधिकारशाहीसमोर कोणत्याही स्थितीत झुकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दाखवून दिले आहे.
निकष काय?
जिंकण्याची क्षमता हाच तिकीट मिळण्याचा निकष असेल, असे रवी यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या मुलाला तिकीट दिले जाईल, अशी घोषणा येदीयुरप्पांनी केल्यामुळे नाराज झालेल्या येदीयुरप्पा विरोधी गटाला शांत करण्यासाठी रवी यांनी वक्तव्य केले असल्याचे बाेलले जाते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"