खासदार मनोज तिवारी ड्रायव्हर, मंत्री गिरीराज गाडीत, तरी बागेश्वर बाबांच्या गाडीचे चलन पोलिसांनी फाडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 12:28 PM2023-05-19T12:28:36+5:302023-05-19T12:30:53+5:30
तक्रारीनंतर पाटणा वाहतूक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला.
बागेश्वरचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री ज्या वाहनातून पाटणा विमानतळावरून हॉटेलपर्यंत आले होते, त्या वाहनाला दंड ठोठावण्यात आला आहे. बागेश्वर बाबा यांच्यासोबत भाजपाचे खासदार गिरिराज सिंह आणि मनोज तिवारीही होते. बागेश्वर बाबा यांची गाडी मनोज तिवारी चालवत होते. तर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह मागच्या सीटवर बसले होते.
पाटणा विमानतळावरून हॉटेलमध्ये जाताना तिघांपैकी कोणीही सीट बेल्ट घातला नसल्याची तक्रार वाहतूक पोलिसांकडे आली होती. तक्रारीनंतर पाटणा वाहतूक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासात तक्रारीची पुष्टी झाली. त्यानंतर पोलीसांनी कारवाई करत दंड ठोठावला. वाहतूक विभागाचे एसपी पुरण झा यांनी दंड ठोठावल्याचा कारवाईला दुजोरा दिला आहे, मात्र नेमकी किती रक्कम आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पाटणाचे वाहतूक विभागाचे एसपी पूरण झा यांनी सांगितले की, बागेश्वर बाबा ज्या दिवशी पाटण्याला आले होते. त्यादिवशी विमानतळावरून हॉटेलसाठी निघताना कारमध्ये बसलेल्यांपैकी कोणीही सीट बेल्ट घातला नव्हता, अशी तक्रार प्राप्त झाली. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर कारमध्ये बसलेल्या लोकांनी बेल्ट घातले होते की नाही हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज काढण्यात आले. त्यामध्ये कोणीही सीट बेल्ट घातला नसल्याचे आढळून आले. त्यानंतर कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
इंद्र विक्रम सिंह यांची गाडी-
समोर बसलेले बाबा धीरेंद्र शास्त्री, गाडी चालवणारे खासदार मनोज तिवारी आणि मागे बसलेले केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी सीट बेल्ट लावला नसल्याची तक्रार पाटणा वाहतूक पोलिसांना मिळाली. MP 16C 5005 हे वाहन छतरपूर मध्य प्रदेशमध्ये नोंदणीकृत असल्याचे सांगितले जाते. ऑनलाइन नोंदीनुसार, २५ एप्रिल २०१५ रोजी इंद्र विक्रम सिंग बुंदेला यांच्या नावाने नोंदणीकृत या आलिशान कारचे नियंत्रित प्रदूषण प्रमाणपत्र २८ सप्टेंबर २०२० रोजी संपले असल्याचे सांगण्यात आले. त्यावर देखील वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.