DCP ऑफिसमध्येच भरला दिव्य दरबार; बागेश्वर बाबांनी सांगितले दिल्ली पोलिसांचे भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 04:43 PM2023-07-09T16:43:19+5:302023-07-09T16:44:40+5:30
Bageshwar Dham Dhirendra Shastri: दिल्लीत चक्क DCP ऑफिसमध्येच बागेश्वर बाबा यांचा दरबार भरल्याचे म्हटले जात आहे. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी अनेक पोलिसांना भविष्यही सांगितले.
Bageshwar Dham Dhirendra Shastri:बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री सातत्याने चर्चेत आहेत. अलीकडेच बागेश्वर बाबा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो नोटांची उधळण बागेश्वर बाबा यांच्यावर करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यातच आता बागेश्वर बाबा दिल्लीत असून, दिल्लीपोलिसांच्या डीसीपी ऑफिसमध्येच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार भरल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री राजधानी दिल्लीत हनुमान कथा कार्यक्रमासाठी पोहोचले आहेत. यावेळी दिल्ली पोलिसांचे अधिकारी आणि जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. हनुमान कथा कार्यक्रम संपल्यावर पोलीस अधिकारी बागेश्वर बाबांना डीसीपी कार्यालयात नेण्यात आले. तिथे कॉन्फरन्सिंग रूममध्ये बाबांचा दरबार भरला होता. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी बाबांना त्यांच्या भविष्याविषयी विचारले.
धीरेंद्र शास्त्री सुमारे तासभर थांबले
दिल्ली पोलिसांनी बागेश्वर बाबा यांना डीसीपी इस्ट कार्यालयात येण्याची विनंती केली. डीसीपी पूर्व कार्यालयात बाबांचा दरबार भरला होता. पोलिस अधिकारी बैठका आणि पत्रकार परिषदा घेतात, तिथे बागेश्वर बाबांचे सिंहासन ठेवण्यात आले. दालनात फोटो, व्हिडीओ बनवू नका, अशा सक्त सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी फोटो काढून व्हिडिओ बनवल्याचे सांगितले जात आहे. या कक्षात धीरेंद्र शास्त्री सुमारे तासभर थांबले. प्रथम सर्वांनी आपली ओळख करून दिली आणि काही पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी आपले भविष्य बागेश्वर बाबा यांना विचारले. बाबांनी काही अधिकाऱ्यांना त्यांचे भविष्य सांगितले, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, बागेश्वर बाबा निघताना सगळे पोलिस हात जोडून निरोप घेत होते. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडे उत्तर नव्हते. बागेश्वर बाबांनी पोलीस कार्यालयातच आपला दरबार भरवल्याचे चित्र प्रथमच समोर आले आहे.