बाबा बालकनाथ यांचा लोकसभा खासदारकीचा राजीनामा; राजस्थानचे होणार मुख्यमंत्री? चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 03:10 PM2023-12-07T15:10:38+5:302023-12-07T15:32:43+5:30
बाबा बालकनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर ते राजस्थानचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
नवी दिल्ली : बाबा बालकनाथ यांनी लोकसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी गुरुवारी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बालकनाथ यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. बालकनाथ राजस्थानच्या अलवर मतदारसंघातून खासदार होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते तिजारा येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान, बाबा बालकनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर ते राजस्थानचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतही आपले केंद्रीय मंत्री आणि खासदार उभे केले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन केंद्रीय मंत्र्यांसह १२ खासदारांना उमेदवारी दिली होती. यापैकी गणेश सिंह आणि फग्गनसिंग कुलस्ते वगळता १० खासदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर खासदारांनी राजीनामा दिला आहे. काल म्हणजेच बुधवारी १० खासदार आणि मंत्र्यांनी राजीनामे दिले होते.
या खासदारांनी दिला राजीनामा
आपल्या खासदारकीचा राजीमाना देणाऱ्यांमध्ये मध्य प्रदेशातील राकेश सिंह, प्रल्हाद पटेल, रिती पाठक, उदय प्रताप सिंग, नरेंद्र सिंह तोमर यांचा समावेश आहे. तर राजस्थानमधील किरोडीमल मीना, दिया कुमारी, राज्यवर्धन राठोड आणि छत्तीसगडमधील गोमती साई व अरुण साव या खासदारांनी राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नावावरून सस्पेंस
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणेच राजस्थानमध्येही मुख्यमंत्र्यांच्या नावावरून सस्पेंस आहे. दिया कुमारी यांनी जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. आज राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे जेपी नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेणार आहेत. यातच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत बाबा बालकनाथ यांचेही नाव चर्चेत येत आहे.