बाबा राम रहीमला जन्मठेप ठोठवा!, दोन बलात्कार पीडितांचा न्यायालयात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 04:21 AM2017-10-05T04:21:23+5:302017-10-05T04:23:21+5:30

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम याला बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा ठोठावा, अशी विनंती दोन बलात्कारपीडित महिलांनी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयास केली आहे.

Baba Ram Rahim's life imprisonment, two rape victims filed in court | बाबा राम रहीमला जन्मठेप ठोठवा!, दोन बलात्कार पीडितांचा न्यायालयात अर्ज

बाबा राम रहीमला जन्मठेप ठोठवा!, दोन बलात्कार पीडितांचा न्यायालयात अर्ज

Next

चंदीगढ : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम याला बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा ठोठावा, अशी विनंती दोन बलात्कारपीडित महिलांनी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयास केली आहे.
या महिलांच्या फिर्यादीवरून उभ्या राहिलेल्या बलात्काराच्या दोन खटल्यांमध्ये पंचकुला येथील विशेष न्यायालयाने राम रहीमला २८ आॅगस्ट रोजी १० वर्षांची कैद आणि १५ लाख रुपये अशी शिक्षा ठोठावली होती. राम रहीम सध्या रोहतक जिल्ह्यातील सुनरिया तुरुंगात आहे.
शिक्षा वाढविण्यासाठी या महिलांनी उच्च न्यायालयात फेरविचार अर्ज केला असल्याचे त्यांचे वकील अ‍ॅड. नवकिरन सिंग यांनी सांगितले. बाबाला जन्मठेप का द्यायला हवी, याचे कारण विषद करताना अर्जात म्हटले आहे की, या पंथामध्ये अनुयायी बाबांना ‘पिता’ मानतात. या नात्याने या दोन्ही महिला भावनिक व धार्मिकदृष्ट्या बाबांच्या कह्यात होत्या. बाबाने या आपल्या आध्यात्मिक पदाचा गैरवापर करून विश्वास आणि श्रद्धेला तडा दिला. त्यामुळे त्याला बलात्कारासाठी देता येऊ शकणारी जन्मठेप ही जास्तीत जास्त शिक्षा दिली जाणे आवश्यक आहे.

बाबा गुरमीत राम रहीमची कथित मानलेली मुलगी हनीप्रीत इन्सान (खरे नाव प्रियांका तनेजा) हिची येथील विशेष न्यायालयाने बुधवारी सहा दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.
बलात्कार खटल्यात बाबाला शिक्षा झाल्यानंतर पंथाच्या अनुयायांनी केलेल्या हिंसाचारात ३८ जण ठार तर २०० हून अधिक जखमी झाले होते. या हिंसाचारास चिथावणी देणे व शिक्षेनंतर बाबाचे अपहरण करण्याच्या कटात सहभागी असणे या आरोपांवरून हनीप्रीतला मंगळवारी अटक झाली होती.
ती ३९ दिवस फरार होती. न्यायालयात तिने छातीत दुखत असल्याची तक्रार केली, परंतु डॉक्टरांनी ती ठाकठीक असल्याचा अहवाल दिला.
तिची कालच अटकेनंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.

Web Title: Baba Ram Rahim's life imprisonment, two rape victims filed in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.