अॅलोपॅथीनं कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले हे मान्य, पण आयुर्वेदाचाही सन्मान केला पाहिजे : बाबा रामदेव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 00:08 IST2021-05-31T00:05:12+5:302021-05-31T00:08:02+5:30
Baba Ramdev : अॅलोपॅथीसोबत योगही आवश्यक असल्याचं बाबा रामदेव यांचं मत

अॅलोपॅथीनं कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले हे मान्य, पण आयुर्वेदाचाही सन्मान केला पाहिजे : बाबा रामदेव
अॅलोपॅथी उपचार पद्धतीवर दिलेल्या आपल्या वक्तव्यानंतर डॉक्टरांच्या टीकेला सामोरे जावे लागलेल्या योगगुरु बाबा रामदेव यांनी रविवारी आपण आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितल्याचं म्हटलं. तसंच आपण आपलं वक्तव्य मागे घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आयएमएवर (IMA) पलटवार केला आणि ९८ टक्के आजारांवरील उपचार आयुर्वेदानंही शक्य असल्याचं म्हटलं.
योग आणि आयुर्वेदाचं महत्त्व सांगताना बाबा रामदेव यांनी ९८ टक्के आजारांवरील उपचार हे आयुर्वेदाच्या सहाय्यानं शक्य असल्याचं म्हटलं. त्यांनी न्यूज १८ इंडियाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं. अॅलोपॅथीच्या उपचारांमुळे कोट्यवधी लोकांचे प्राण वाचले हे आपण मानतो, परंतु आयुर्वेदाचाही सन्मान केला गेला पाहिजे असं ते म्हणाले.
आयएमए इंग्रजांनी बनवलेला एनजीओ
"आयुर्वेदात अनेक आजारांवरील उपचार उपलब्ध आहेत. अॅलोपॅथीमध्ये महागड्या औषधांचं चक्रव्यूह आहे. लोकांची लूट केली जाते आणि फार्मा इंडस्ट्री ही लूट करते," असं बाबा रामदेव म्हणाले. तसंच आयएमए हा इंग्रजांनी तयार केलेला एक एनजीओ असल्याचं म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधला. "आयएमए हा इंग्रजांनी तयार केलेला एनजीओ आहे. त्याच्या अध्यक्षांना आणि महामंत्र्यांना बर्खास्त केलं जावं. आयएमए कोणतीही कायदेशीर संस्था नाही आणि त्यांच्याकडे कोणतंही रिसर्च सेंटर नाही. मी आयएमएची मानहानी केली नाही. उलट मला आयएमएवर मानहानीचा दावा करायला हवा. आपण ९० टक्के डॉक्टरांचा सन्मान करतो, परंतु काही डॉक्टर्स लूट करत आहेत," असंही ते म्हणाले.
अॅलोपॅथीसोबत योगही आवश्यक
अॅलोपॅथीवर केलेल्या वक्तव्यावरून बाबा रामदेव यांनी आयएमएवर राजकारण केल्याचा आरोप केला. तसंच आपलं वक्तव्य हे व्हॉट्सअॅपवर मिळालेल्या माहितीवर आधारित होतं, असं त्यांनी स्पष्ट केलं. "आयएमएचे डॉक्टर्सचं वर्तन असभ्य होतं आणि ते राजकारणावर आले. माझं वक्तव्य अधिकृत नव्हतं. जी माहिती व्हॉट्सअॅपवर आली ती मी वाचून दाखवली. अॅलोपॅथीनं कोट्यवधी लोकांचं जीव वाचवले आहेत. परंतु अॅलोपॅथीमध्ये अनेक आजारांवरील औषध नाही. अॅलोपॅथीबाबत घृणा असण्याचा प्रश्न नाही. परंतु आयुर्वेदाचागी सन्मान केला गेला पाहिजे. अॅलोपॅथी औषधांसोबत योगही आवश्यक आहे. कोरोना महासाथीमध्ये आपल्याला एकत्र लढायचं आहे," असंही बाबा रामदेव म्हणाले.