"बाबा रामदेव यांच्याकडे प्रत्येक आजारावर औषध, ते मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करू शकतात’’ राजस्थानच्या मंत्र्यांनी लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 03:31 PM2020-06-26T15:31:53+5:302020-06-26T15:40:43+5:30
बाबा रामदेव हे मेलेल्या माणसालासुद्धा बरे करू शकता, तशा प्रकारचे औषध त्यांच्याकडे असेल, असा टोला राजस्थानचे यूडीएच मंत्री शांती धारीवाल यांनी लगावला आहे.
जयपूर - योगगुरू बाबा रामदेव यांनी आणलेल्या कोरोनावरील औषथावरून सध्या मोठा वाद पेटलेला आहे. अनेक राज्यांनी या ओषधावर बंदी आणली आहे. तसेच आयसीएमआर आणि आयुष मंत्रालयानेही कोरोनिलबाबत कडक भूमिका घेतली आहे. दरम्यान, बाबा रामदेव हे मेलेल्या माणसालासुद्धा बरे करू शकता, तशा प्रकारचे औषध त्यांच्याकडे असेल, असा टोला राजस्थानचे यूडीएच मंत्री शांती धारीवाल यांनी लगावला आहे.
बाबा रामदेव यांनी केलेल्या दाव्यावर टीका करताना राजस्थानचे यूडीएच मंत्री शांती धारीवाल म्हणाले की, ‘’बाबा रामदेव यांच्याकडे प्रत्येक आजारावरील औषध उपलब्ध आहे. ते मेलेल्या माणसालासुद्धा जिवंत करू शकतात. त्या प्रकारचे औषधसुद्धा त्यांच्याकडे असू शकते,’’ दरम्यान, धारीवाल यांचे बाबा रामदेव यांच्या औषधाबाबतचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे बरा करणारे कोरोनिल हे औषध आपण तयार केल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला होता. त्यानंतर बाबा रामदेव यांच्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. बाबा रामदेव यांनी आणलेल्या कोरोनिल या औषधाची राजस्थानमध्ये वैद्यकीय चाचणी झाली आहे का, यावरूनही आता विवाद सुरू झाला आहे. तत्पूर्वी राजस्थानचे आरोग्य मंत्री रघू शर्मा यांनीही बाबा रामदेव यांच्या औषधाबाबत परखड मत व्यक्त केले होते.
बाबा रामदेव यांच्या दाव्यामुळे जगभरता खळबळ उडाली होती. मात्र आता या औषधावरून बाबांच्याच अडचणी वाढताना दिसत आहेत. आतातर या औषधाचे अनावरण करताना बाबांसोबत असलेले निम्स युनिव्हर्सिटीचे मालक आणि चेअरमन बी. एस. तोमर यांनीही बाबांची साथ सोडली आहे. आपल्या रुग्णालयात कोरोनाच्या औषधाची कुठलीही वैद्यकीय चाचणी झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या