Baba Ramdev On Bageshwar Baba: बाबा रामदेव यांचा बागेश्वर बाबांना पाठिंबा? समर्थन देत म्हणाले, “जे सत्य दिसतंय ते...”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 12:48 PM2023-01-23T12:48:16+5:302023-01-23T12:48:28+5:30
Baba Ramdev On Bageshwar Baba: बाबा रामदेव यांनी बागेश्वर धाम वादावर प्रतिक्रिया देताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना पाठिंबा दर्शवला आहे.
Baba Ramdev On Bageshwar Baba: गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा अचानक चर्चेत आले असून, चमत्कार करण्यावरून वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यावरून बागेश्वर बाबांवर टीका केली जात असून, अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला जात आहे. यातच पतंजलि योगपीठाचे बाबा रामदेव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना पाठिंबा दर्शवला आहे. बाबा रामदेव यांनी बागेश्वर बाबा यांचे समर्थन करत, त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांवर टीका केली आहे.
काही ढोंगी लोक धीरेंद्र शास्त्री यांच्यावर आरोप करत सुटले आहेत. हे लोक धीरेंद्र शास्त्री यांना विचारत आहेत की बालाजीची कृपा काय, हनुमानजीची कृपा काय? ज्यांना बाहेरच्या डोळ्यांनी पाहायचे असेल, त्यांनी अवश्य धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना विचारणा करावी. मात्र, ज्यांना तर्क-वितर्क, वाद-विवाद करायचा आहे, त्यांनी रामभद्राचार्य यांच्याकडे जावे. आणि ज्यांना चमत्कार पाहायचा आहे, त्यांनी यांचे शिष्य धीरेंद्र शास्त्री यांच्याकडे जावे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
डोळ्यांना दिसणारे सत्य एक टक्का आहे
मीडियाशी या विषयावर जास्त बोलत नाही. पण, सर्वत्र दांभिकता शोधू नका, हे सत्य आहे जे दिसते आणि जे डोळ्यांनी दिसते ते एक टक्का आहे, हे सांगू इच्छितो. तसेच तुम्ही सनातन धर्माला पुढे नेण्याचे काम करावे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, नागपुरात श्रीराम चरित्रावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा दरबार होता. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला. यानंतर चमत्कार सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान देत, ३० लाखांचे बक्षीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून जाहीर करण्यात आले. हे आव्हान बागेश्वर बाबा यांनी स्वीकारले.
दरम्यान, भारतात चादर चढवणे आणि मेणबत्ती लावणे ही श्रद्धा आहे, पण नारळ बांधणे ही अंधश्रद्धा आहे. लोकांमध्ये हा दांभिकपणा कुठून येतो माहिती नाही. देशात हिंदू बाबांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. यामुळे त्यांनाही टार्गेट केले जात आहे, मात्र, या गोष्टींमुळे घाबरणार नाही, असा इशारा बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"