बाबा रामदेव यांची पतंजली आता टेक्सटाईल उद्योगात, विदेशी ब्रँड्सला टक्कर देण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 08:21 AM2017-09-28T08:21:10+5:302017-09-28T08:27:43+5:30
रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण आता टेक्सटाईल उद्योगात येण्याची तयारी करत आहेत.
अलवर- पतंजली उद्योग समुहाचे आयुर्वेदिक आणि हर्बल उत्पादन सध्या अनेक जण वापरत आहेत. पतंजलीच्या या यशस्वी उत्पादनानंतर रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण आता टेक्सटाईल उद्योगात येण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे बाजारात लवकरच पतंजलीची अंतर्वस्त्रापासून ते क्रीडा पोषाखापर्यंतची उत्पादने पाहायला मिळतील. अलवर येथे पतंजली ग्रामोद्योगाचं उद्घाटन करताना रामदेव बाबांनीच ही माहिती दिली. पतंजली लवकरच कपडे आणि टेक्सटाईल बाजारात पाऊल ठेवणार असून विदेशी कंपन्यांना ते टक्कर देतील. पतंजली अंतर्वस्त्रापासून ते पारंपारिक कपडे आणि क्रीडा पोषाख तयार करणार असल्याचं बाबा रामदेव यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे.
नुकताच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात पतंजली आयुर्वेदचे सीईओ आणि रामदेव बाबांचे सहकारी बालकृष्ण हे देशातील आठवे सर्वांत श्रीमंत व्यक्ती असल्याचं समोर आलं आहे. बालकृष्ण यांना होणारा फायदा हा गरजूंसाठी आहे, तो फायदा आरामदायी जीवन जगण्यासाठी नाही, असं रामदेव बाबा म्हणाले आहेत.
रामदेव बाबा यांनी आपला उद्देश हा देशातील विदेशी कंपन्यांचं असलेलं वर्चस्व संपवण्याचा आहे, असंही सांगितलं. कंपनी स्वदेशी कपडे तयार करणार असून याची सुरूवातीची गुंतवणूक ही ५ हजार कोटी रूपयांची असेल. या नव्या उद्योगाच्या माध्यमातून पतंजली चांगल्या दर्जाचे कपडे लोकांसाठी आणणार आहे. यामध्ये जीन्स पँटपासून ते स्वेटरपर्यंतच्या कपड्यांचा समावेश असेल, असं पतंजलीचे प्रवक्ता एस.के. तिजोरीवाला यांनी सांगितलं आहे. पण या कपड्याच्या ब्रँडचं नाव नेमकं काय असेल? याबद्दल अजून सांगण्यात आलेलं नाही.
मानवी शरीर 400 वर्षे जगण्यासाठी बनलेले आहे - बाबा रामदेव
मानवी शरीर हे ४०० वर्षे जगण्यासाठी बनलेले आहे मात्र आपण अयोग्य जीवनशैलीद्वारे आजारांना आमंत्रण देतो आणि आयुष्य लवकर संपते, असा दावा योगगुरु बाबा रामदेव यांनी केला. चांगले अन्न आणि व्यायामाच्या मदतीने रोगमुक्त जीवन जगा, असा सल्लाही बाबा रामदेव यांनी लोकांना दिला. १२ व्या नॅशनल क्वालिटी कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना रामदेव म्हणाले, "मानवी शरीर हे ४०० वर्षे जगण्यासाठी बनलेले आहे, मात्र अतिरेकी अन्न व अयोग्य जीवनशैलीने आपण त्यावर अत्याचार करतो. आपण रक्तदाब, हृदयरोग आणि इतर आजारांना आमंत्रण देतो आणि आयुष्य कमी करुन घेतो व उर्वरित वर्षे डॉक्टर व औषधांच्या मदतीने जगतो".