बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे प्रोडक्ट आता मिळणार ऑनलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 01:13 PM2018-01-16T13:13:27+5:302018-01-16T13:17:03+5:30
योग गुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी मिळून पतंजलीचे प्रोडक्ट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले आहेत.
मुंबई- योग गुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी मिळून पतंजलीचे प्रोडक्ट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले आहेत. आता ग्राहकांना पतंजलीचे प्रोडक्ट अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, ग्रोफर्स आणि बिगबास्केटसह इतर ऑनलाइन पोर्टलवरून विकत घेता येणार आहेत. या शिवाय पतंजलीचे प्रोडक्ट शॉपक्लूज व नेटमेड्स वरही मिळणार आहेत. योग गुरू बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सच्या अधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेतली. पतंजली कंपनी आता नॉट फॉर प्रॉफीटच्या दिशेने पुढे जाईल. कंपनी आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून संत्री विकत घेईल, असं रामदेव बाबा यांनी यावेळी म्हंटलं. सध्या लोक ऑनलाइन शॉपिंगला जास्त महत्त्व देतात. अशा लोकांसाठी पतंजलीचे प्रोडक्ट ऑनलाइन असणं चांगला उपक्रम असल्याचं, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलं.
50 वर्षात संपूर्ण जग जिंकायचं स्वप्न उराशी बाळगून आम्ही पुढे जातो आहे. येणाऱ्या काळात पतंजली 10 ते 12 देशात नंबर वनवर असेल, असं बाबा रामदेव यांनी म्हंटलं. पत्रकार परिषदेमध्ये बाबा रामदेव यांनी स्वतःबद्दल व बालकृष्ण यांच्याबद्दलही सांगितलं. मी आणि बालकृष्ण यांनी एका गावातून प्रवास सुरू केला होता. आम्ही दोघंही शेतकऱ्याची मुलं आहोत, असं ते म्हणाले.
रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या वस्तूंना बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे ई-कॉमर्स वेबसाइट्सवरही त्यांना तसाच प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. स्वदेशी अभियान ध्यानात ठेवून कंपनीला स्वदेशी प्रोडक्ट प्रच्येक घरात पोहचवायचे असल्याचं, बालकृष्ण यांनी सांगितलं. ऑनलाइन माध्यमातून वर्षाला दोन हजार करोड रूपयांचे पतंजली प्रोडक्टची विक्री करण्याचं उद्दिष्टं असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हंटलं आहे.