हिस्सारमध्ये बाबा रामपाल समर्थकांचा पोलिसांवर गोळीबार
By admin | Published: November 18, 2014 01:23 PM2014-11-18T13:23:25+5:302014-11-18T15:32:46+5:30
हरियाणातील अध्यात्मिक गुरू बाबा रामपाल यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर रामपाल यांच्या समर्थकांनी गोळीबार व दगडफेक केली.
Next
ऑनलाइन लोकमत
हिस्सार, दि. १८ - हरियाणातील अध्यात्मिक गुरू बाबा रामपाल यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना रामपाल यांच्या समर्थकांनी विरोध केला असून पोलिस व समर्थकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. मंगळवारी पोलिस बरवालास्थित सतलोक आश्रमात रामपाल यांना अटक करण्यास पोचले असता पोलिस आश्रमात घुसू नयेत यासाठी रामपाल यांच्या हजारो भक्तांनी आश्रमाला वेढा घातला. तसेच पोलिसांवर गोळीबार करत दगडफेकही केली. अखेर हा हल्ला थांबवण्यासाठी व समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला. या धुमश्चक्रीत पोलिसांह अनेक भक्त जखमी झाले असून त्यांना उपाचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या सर्व घटनेमुळे येथे अतिशय तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान बाबा रामपाल हे आश्रमात नसल्याची माहिती आश्रमाचे प्रवक्ते राज कपूर यांनी दिली आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना बाहेर हलवण्यात आल्याचे कपूर यांनी सांगितले मात्र त्यांचा ठावठिकाणा सांगण्यास त्यांनी नकार दिला.
बाबा रामपालना अटक करण्यात उशीर करत असल्यावरून न्यायालयाने पोलिसांची कानउघडणी करत २१ नोव्हेंबरपर्यंत रामपाल यांना न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर पोलिसांनी सतलोक आश्रमात बाबांना अटक करण्यास पोचले असताना बाबांच्या समर्थकांनी त्यांना विरोध करत त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.