हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी बाबा साकार हरींच्या वकिलाने केला नवा दावा, म्हणाले, ‘’विषारी स्प्रेमुळे…’’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 07:08 PM2024-07-07T19:08:42+5:302024-07-07T19:09:05+5:30
Hathras stampede case: हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात बाबा साकार हरी यांचं वकिलपत्र घेणारे वकील ए.पी. सिंह हे बाबांच्या बचावासाठी रोज नवनवे दावे करत आहेत. आज ए.पी. सिंह यांनी हाथरस येथे झालेली चेंगराचेंगरी ही जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा तसेच तिथे विषारी स्प्रेचा वापर झाल्याचा दावा केला आहे.
गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका सत्संगामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १२३ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सत्संगाचा आयोजन करणाऱ्या आयोजकांसह बाबा साकार हरीविरोधातही कठोर कारवाईसाठी पावलं उचलली जात आहेत. मात्र या प्रकरणात बाबा साकार हरी यांचं वकिलपत्र घेणारे वकील ए.पी. सिंह हे बाबांच्या बचावासाठी रोज नवनवे दावे करत आहेत. आज ए.पी. सिंह यांनी हाथरस येथे झालेली चेंगराचेंगरी ही जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा तसेच तिथे विषारी स्प्रेचा वापर झाल्याचा दावा केला आहे.
हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. बाबा साकार हरी यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. मात्र त्यांना अद्याप अटक झालेली नाही. मात्र बाबांचे वकील ए.पी. सिंह त्यांच्या बचावासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यांनी आज सांगितले की, बाबांच्या विरोधात चेंगराचेंगरीचा कट रचला गेला होता. ही चेंगराचेंगरी झाली नाही, तर घडवून आणण्यात आली. त्यासाठी हा कट रचणाऱ्यांनी विषारी स्प्रेचा वापर केला. सत्संग संपल्यानंतर एका नियोजनबद्ध कटानुसार काही लोक बाबांच्या दिशेने धावत गेले. त्यांच्या हातामध्ये विषारी स्प्रे होता. ते धावताना मागच्या बाजूने विषारी स्प्रेचा फवारा मारत बाबांच्या दिशेने गेले.
सिंह यांनी पुढे सांगितले की, या स्प्रेचा प्रभाव महिलांवर पडला आणि त्या बेशुद्ध पडत गेल्या. त्या खाली पडल्या आणि गोंधळ उडाला. त्यामुळे ही चेंगराचेंगरीची घटना घडली. काही अज्ञात लोक विषारी स्प्रे घेऊन जात होते. ते स्प्रेचा फवारा मारत पळाले, हा एका पूर्वनियोजित कटाचा भाग दिसत आहे. अनेकजण बेशुद्ध झाले. आता या घटनेमागे कुणाचा हात आहे, याचा शोध तपास पथकाने घ्यावा, अशी मी मागणी करतो, असे एपी सिंह म्हणाले.