गांजा ओढणाऱ्या बाबांनाही तुरुंगात डांबा - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 05:27 AM2021-10-27T05:27:12+5:302021-10-27T05:27:52+5:30
Ramdas Athawale : आश्रमात ड्रग्ज खरेदी-विक्री होत असेल तर नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने तिथेही कारवाई करावी, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.
- विकास झाडे
नवी दिल्ली : कायद्यापुढे सगळे समान असतात. मग तो शाहरुख खानचा मुलगा आर्यन असो, की कुंभमेळ्यात गांजा ओढणारे भोंदू बाबा. त्या सर्वांवर कारवाई होणे गरजेचे आहे. आश्रमात ड्रग्ज खरेदी-विक्री होत असेल तर नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने तिथेही कारवाई करावी, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे दलित असल्यामुळेच महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे त्यांना लक्ष्य करीत आहेत. स्वत:च्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यामुळे खवळलेल्या नवाब मलिकांनी वानखेडे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे, असा आरोप रामदास आठवले यांनी केला.
‘त्या’ बाबांनाही टाका व्यसनमुक्ती केंद्रात
एनसीबीला पाच ग्रॅम ड्रग्जची माहिती मिळू शकते मग सर्रास गांजा, ड्रग्ज ओढणारे बाबा का दिसत नाहीत? यावर उत्तर आठवले म्हणाले की, सगळ्यांनाच समान न्याय हवा. नशा करणाऱ्या भोंदू बाबांनाही कायद्यानुसार तुरुंगात डांबावे आणि सामाजिक न्याय विभागाच्या भूमिकेनुसार त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात भरती करावे.