बाबराने मंदिर पाडले नाही, तेथे मशिदही बांधली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 05:14 AM2019-08-29T05:14:10+5:302019-08-29T05:14:20+5:30

अयोध्या वाद : हिंदू पक्षकाराचा सुप्रीम कोर्टात दावा

Babar did not demolish a temple, nor built a mosque there | बाबराने मंदिर पाडले नाही, तेथे मशिदही बांधली नाही

बाबराने मंदिर पाडले नाही, तेथे मशिदही बांधली नाही

googlenewsNext

नवी दिल्ली : मुघल बादशहा बाबर अयोध्येत कधी आलाच नव्हता व सन १५२८ मध्ये तेथील वादग्रस्त जागेवरील मंदिर पाडून तेथे मशिद बांधण्याचा आदेशही त्याने कधी दिला नव्हता, असा दावा एका हिंदू पक्षकाराने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला.


अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जमिनीची तीन समान भागांत वाटणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केलेल्या अपिलांवरील दैनंदिन सुनावणी सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील विशेष घटनापीठापुढे १४ व्या दिवशीही अपूर्ण राहिली. बुधवारी ‘अखिल भारतीय श्री राम जन्मभूमी पुनरुद्धार समिती’ या हिंदू पक्षकारातर्फे ज्येष्ठ वकील पी. एन. मिश्रा यांचा युक्तिवाद झाला.
‘तुझुक-ई-बाबरी’ (बाबरनामा), ‘हुमायूंनामा’, ‘अकबरनामा’ आणि ‘तुझुक-ई-जहांगिरी’ या मुघल बादशहांच्या तत्कालिन चरित्रात्मक ग्रथांचे संदर्भ देत अ‍ॅड. मिश्रा म्हणाले की, खास करून ‘बाबरनामा’मध्ये बाबराचा सेनापती मिर बकी याने अयोध्येतील मंदिर पाडल्याचा किंवा तेथे मशिद बांधल्याचा कुठेही उल्लेख नाही. ते म्हणाले की, बाबर कधी अयोध्येत आलाच नव्हता त्यामुळे सन १५२८ मध्ये त्याने तेथील मशिद पाडण्याचा व मशिद बांधण्याचा आदेश देण्याचा प्रश्नच येत नाही. एवढेच कशाला बाबराचा मिर बकी नावाचा कोणी सेनापती असल्याचाही उल्लेख आढळत नाही.


हे सर्व संदर्भ तुम्ही कशासाठी देत आहात, या न्यायमूर्तींच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅड. मिश्रा म्हणाले की, आमचे मंदिर हे प्रत्यक्षात मशिद असल्याचा मुस्लिम पक्षकारांचा दावा आहे. प्रतिवादी या नात्याने तो खोडून काढण्यासाठी मला हे दाखवावे लागत आहे.त्यांच्या या कथित मशिदीला बाबरी मशिद म्हणायचे असेल तर ती बाबराने बांधली किंवा त्याच्या आदेशावरून बांधली गेली हे सिद्ध व्हायला हवे. एखादी व्यक्ती खोटे बोलू शकते, पण इतिहासातील परिस्थितीजन्य संदर्भ असत्य असू शकत नाहीत.


अ‍ॅड. मिश्रा पुढे असेही म्हणाले की, या उलट अबुल फजलने सन १५७६ मध्ये लिहिलेले ‘ऐन-ई-अकबरी’ पाहा. त्यात फजल अयोध्येतील ‘रामकोट’चा उल्लेख करतो व ती जागा श्री रामाचे जन्मस्थान असल्याची हिंदूंची श्रद्धा असल्याचेही लिहितो. या पुस्तकात याच परिसरातील तीन थडग्यांचे तपशीलवार वर्णन आहे, पण तेथे मशिद असल्याचा पुसटसाही उल्लेख नाही.

Web Title: Babar did not demolish a temple, nor built a mosque there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.