बाबासाहेबांना दलितांपुरतं मर्यादित ठेवू नये - नरेंद्र मोदी
By admin | Published: March 21, 2016 12:19 PM2016-03-21T12:19:48+5:302016-03-21T13:23:14+5:30
आपण बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा तारणहार बनवत त्यांच्यावर अन्याय करत आहोत, बाबासाहेबांना मर्यादित ठेवू नये असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २१ - 'आपण बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा तारणहार बनवत त्यांच्यावर अन्याय करत आहोत, बाबासाहेबांना मर्यादित ठेवू नये', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाचा शीलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला. 'बाबासाहेब आपल्याला 1956मध्ये सोडून गेले, आज 60 वर्षानंतर आपण स्मारक बांधायला सुरुवात करत आहोत', अशी खंतदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
'बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक अमानुष घटनेविरोधात आवाज उठवणारे महापुरुष होते. ज्याप्रकारे सरदार पटेल यांनी राजकीय एकीकरणासाठी काम केलं त्याप्रमाणे बाबासाहेबांनी सामाजिक एकीकरणासाठी काम केलं. जेव्हा महिलांच्या हक्कांचा विषय आला तेव्हा जर महिलांना समान हक्क मिळणार नसतील तर मी मंत्रिमंडळाचा भाग राहू शकत नाही असं सांगत बाबासाहेब मंत्रिमंडळातून बाहेर पडले होते मात्र इतिहासातील ही गोष्ट लोक विसरले आहेत किंवा बदलली गेली आहे', असं सांगत महिला समान हक्कांचा विषय मोदींनी यावेळी मांडला.
बाबासाहेब जर सरकारमध्ये राहिले असते तर मी जे आज करतो आहे ते त्यांनी 60 वर्षापुर्वीच केलं असतं. काही लोकांना आम्ही अजिबात आवडत नाही, आम्हाला पाहायला पण आवडत नाही, त्यांना आजार होतो, आणि आजारात माणूस काहीही बोलतो, मनावरचा ताबा सुटतो असं म्हणत मोदींनी यावेळी विरोधकांवर टीका केली.
'वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा काही लोक आता आरक्षण जाईल असं बोलायला लागले, मात्र असं काहीच झालं नाही. दलित, आदिवसींच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागलेला नाही, मात्र जिथे आमची सत्ता आहे तिथे अजूनही खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. दलित, आदिवासी आणि दुर्लक्षित घटकांचा आरक्षण अधिकार आहे, तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही', असं सांगत मोदींनी आरक्षणाबाबतची सरकारची भुमिका स्पष्ट केली. 'बाबासाहेबांच स्वप्न पुर्ण करण्याची संधी मला मिळाली आहे. कदाचित हे माझ्या नशिबात होतं'. 26 अलीपूर रोडवर हे स्मारक बांधण्यात येणार असून सार्वजनिक बांधकाम विभाग हे स्मारक उभारणार आहे. या स्मारकाचं उद्धाटन 14 एप्रिल 2018 रोजी करण्यात येणार असल्याचंही नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.