अयोध्येतील मशिदीच्या जमिनीवर अन्नधान्य पिकवून गरिबांना द्यावे : इक्बाल अन्सारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 03:20 PM2020-03-04T15:20:57+5:302020-03-04T15:41:27+5:30
आमचं मान्य केल तर ठिक अन्यथा आम्ही ट्रस्टला विरोध करणार असल्याचे इक्बाल अन्सारी यांनी स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानुसार राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांना मशिद उभारण्यासाठी पाच एकर जमीन देण्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार रौनाही येथील धनीपूर भागात मुस्लीम समाजाला जमीन देण्यात आली आहे. मात्र या जमिनीचा उपयोग शेती करण्यासाठी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मशिदीसाठी देण्यात आलेल्या जमिनीला मुस्लीम पक्षकारांनी विरोध केला होता. मात्र सुन्नी वक्फ बोर्डाने समोर येऊन जमिनीचा स्वीकार केला. आता सुन्नी वक्फ बोर्डाकडून ट्रस्ट स्थापन करण्याची तयारी करण्यात येत आहे. लकवरच ट्रस्टची घोषणा होऊ शकते. बाबरी प्रकरणातील अन्य पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी या जमिनीसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
अन्सारी यांच्यानुसार ट्रस्ट अद्याप स्थापन झाले नाही. सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष कोणाचाही फोन घेत नाहीत. आम्ही अयोध्येत जमिनीची मागणी केली होती. जमीन मिळाल्यानंतर तिथे शाळा, रुग्णालय आणि धर्मशाळा उभारण्याचा आमचा मानस होता, असं अन्सारी यांनी सांगितले.
मुस्लिमांना देण्यात आलेली जमीन कृषीची आहे. शेतीसाठी ही जमीन योग्य आहे. त्यामुळे या जमिनीवर शेती करावी आणि त्यातून निघालेले अन्नधान्य गरिबांना वाटून द्यावे, अशी मागणी अन्सारी यांनी व्यक्त केली आहे. आमचं मान्य केल तर ठिक अन्यथा आम्ही ट्रस्टला विरोध करणार असल्याचे इकबाल अन्सारी यांनी स्पष्ट केले आहे.